देहूनगरीमध्ये हरिनामाचा अखंड गजर
By Admin | Updated: March 12, 2017 03:20 IST2017-03-12T03:20:41+5:302017-03-12T03:20:41+5:30
जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराममहाराज बीजोत्सव मंगळवारी आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी ग्रामपंचायतीसह विविध विभाग आपापली कामे करण्याची कसरत करीत आहे.

देहूनगरीमध्ये हरिनामाचा अखंड गजर
देहूगाव : जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराममहाराज बीजोत्सव मंगळवारी आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी ग्रामपंचायतीसह विविध विभाग आपापली कामे करण्याची कसरत करीत आहे. मंगळवारपूर्वी कामे पूर्ण होतील, असा प्रशासनाला विश्वास आहे. देहूनगरीमध्ये हरिनामाचा गजर सुरू आहे.
विविध दिंड्या व फड दाखल झाले असून, परिसरातील भाविकांसह विविध दिंडीचालकांचे अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले असून, त्यांच्या परिसरात हरिनामाचा गजर हा टिपेला पोहोचला आहे. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात यात्रा स्पेशल हॉटेल व्यावसायिक व विविध वस्तूंचे विक्रेते, प्रसादाची दुकाने येऊन दाखल झाली असून, त्यांची दुकाने लावण्याची लगबग सुरू आहे.
वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी महसूल विभाग, विद्युत, आरोग्य, जीवन प्राधिकरण, श्री संत तुकाराममहाराज संस्थान, ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, आपापल्या परीने भाविकांना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये याची दखल घेत आहेत. या सर्व कामकाजावर नायब तहसीलदार संजय भोसले, हवेली पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, हवेली पंचायत समिती सदस्य हेमलता काळोखे, ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी ग्रामसेवक गणेश वालकोळी, सरपंच सुनीता टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देहू-आळंदी रस्ता व देहू-देहूरोड रस्त्यावरील झेंडेमळ्यापर्यंतचे खड्डे बुजविले असल्याने यात्रा काळात भाविकांना खड्ड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. पाटबंधारे विभागाच्या वतीने इंद्रायणी नदीला पाणी सोडण्यात आले असून, भाविकांच्या स्नानासाठी पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. देहूगावातील वैकुंठगमन रस्ता ते गाथा मंदिर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना यात्रा स्पेशल हॉटेल, विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेत्यांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाचे बाह्यरुग्ण विभाग कार्यरत झाले असून, रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंदिर परिसरात पालखी मार्गावर पीसीसी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.