हापुसचा मुक्काम आठवड्यापुरताच

By Admin | Updated: May 26, 2014 05:28 IST2014-05-26T05:28:57+5:302014-05-26T05:28:57+5:30

कोकणचा राजा हापूस आंब्याची बाजारातील आवक कमालीची कमी झाली असून यंदाचा हंगाम आठवड्याभरातच आवरता घेतला जाणार आहे

Hapus stay for a week | हापुसचा मुक्काम आठवड्यापुरताच

हापुसचा मुक्काम आठवड्यापुरताच

पुणे : कोकणचा राजा हापूस आंब्याची बाजारातील आवक कमालीची कमी झाली असून यंदाचा हंगाम आठवड्याभरातच आवरता घेतला जाणार आहे. आज बाजारात रत्नागिरी हापूसच्या १५०० पेट्यांची आवक झाली. तुलनेने कर्नाटक हापूस, पायरी आणि बदाम आंब्याची मोठी आवक झाली असून, या आंब्याला मोठी मागणी होती. हंगामाच्या सुरूवातीला देवगड, हापूसची बाजारात मोठी आवक झाली होती. नेहमीप्रमाणे या आंब्याला यंदाही मोठी मागणी होती. सुरूवातीला एक डझनसाठी १२०० ते १५०० असणारा आंब्याचा दर २००ते ३५० पर्यंत कमी झाला. आज आलेल्या रत्नागिरी हापूसला बाजारात ४ ते ७ डझनच्या पेटीसाठी ५०० ते १२०० रूपये दर मिळाला, अशी माहिती युवराज काची यांनी दिली. मार्च महिन्यात आवक कमी असल्यामुळे आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हते. सध्या हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आले आहेत. मात्र, हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने आंबा खरेदीसाठी ठोक आणि किरकोळ विक्रे त्यांकडे मागणी वाढू लागली आहे. दोन आठवड्यांपासून आंब्याचे दर कमी होऊ लागले आहेत. यंदाच्या हंगामात कार्बाईड वापरून पिकविलेल्या आंब्यावर मोठी कारवाई करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या या कारवाईत सुमारे नऊ लाख रूपये किमतीचा १५ हजार १७७ किलो आंबा जप्त करण्यात आला. आंबा पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर करण्यास बंदी असताना मार्केटयार्ड आणि शहराच्या विविध भागात कार्बाईडचा वापर करण्यात येत होता. एफडीएच्या कारवाईमुळे व्यापार्‍यांना जरब बसली. नव्याने बाजारात येणारा आंबा दर्जेदार असून, काही ठिकाणी दर्जा कमी असलेल्या किंवा जुन्या पेट्यांमधील आंब्याची विक्र ी सुरू आहे. त्याला मागणी कमी असली तरी, हा आंबा आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो. आज बाजारात कर्नाटक हापूस, पायरी आंब्यांच्या दहा हजार पेट्यांची तर बदाम आंब्यांच्या ६ ते ७ हजार करंड्यांची आवक झाली असल्याचे व्यापारी सतिश उरसळ यांनी सांगितले. हा आंबा जूनच्या मध्यापर्यंत बाजारात उपलब्ध राहील. (प्रतिनिधी)

Web Title: Hapus stay for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.