..घरकुलवाले पाय पसरी!

By Admin | Updated: December 20, 2014 00:16 IST2014-12-20T00:16:58+5:302014-12-20T00:16:58+5:30

घरकुलचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी २००८ पासून तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा केलेल्या घरकुल लाभार्थींपैकी काहींना नशिबाने साथ दिली.

..happy pet feet! | ..घरकुलवाले पाय पसरी!

..घरकुलवाले पाय पसरी!

रिटा कदम, पिंपरी
घरकुलचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी २००८ पासून तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा केलेल्या घरकुल लाभार्थींपैकी काहींना नशिबाने साथ दिली. २०१४ मध्ये त्यांना स्वस्तातील घरकुल मिळाले. भूखंड आणि सदनिकांचे दर गगनाला भिडले असताना या शहरात हक्काच्या घराचे स्वप्न साकारणे धूसर झाले होते. अशा परिस्थितीत हक्काचे घरकुल मिळाले. अवघ्या पावणेचार लाखांत, तेही सुलभ हप्त्याने घरकुलाचा ताबा मिळाला. ताबा मिळाल्यानंतर वर्ष पूर्ण होण्याअगोदरच काहींनी गॅलरीत दुकान थाटले आहे. दिली ओसरी, घरकुलवाले पाय पसरी अशी परिस्थिती घरकुल प्रकल्पाच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनर्निर्माण विकास अभियानांतर्गत (जेएनयूआरएम) महापालिकेने शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरकुल प्रकल्प राबवला आहे. १३ हजार २५० घरांच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ६७२० लाभार्थ्यांना घरकुल बांधून दिली आहेत.निधीची कमतरता भासल्याने दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प बारगळला. उर्वरित संभाव्य लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. ज्यांना घरकुल मिळाले, त्यांनी मात्र लगेच मनमानी सुरू केली आहे. राहण्यासाठी मिळालेल्या घरकुलात अशा प्रकारे विनापरवाना दुकान थाटून पैसे कमाविण्याचा पर्याय काही रहिवाशांनी शोधला आहे. किराणा मालाचे दुकान, गुटखा, पान-बिडी विक्री अशा स्वरूपाची दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत.
अतिशय धोकादायक पद्धतीने दुकाने चालवली जात आहेत. शहरातील इतर किराणा दुकानात साहित्य असते, त्याच प्रकारे घरकुलच्या बाल्कनीत दुकाने थाटण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारचे शॉप अ‍ॅक्ट परवाना नाही की, अधिकाऱ्यांची परवानगी नाही अशा स्वरूपात वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत.
कुलस्वामिनी आणि कल्पतरू या घरकुल इमारतींवरून पडून दोन तरूणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. बाल्कनीतून पडून मृत्यू होण्याच्या घटनांमुळे घरकुल प्रकल्प चर्चेत आला असताना अशा पद्धतीची धोकादायक दुकाने थाटली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घरकुलमध्ये या ना त्या कारणाने अपघात झाले आहेत. कित्येक वेळा बेल वाजली की, घरातील लहान मुले धावत बाल्कनीत येतात आणि खाली वाकून वस्तूची सेवा पुरवतात. आधीच धोकादायक कठड्यांवरून होणारी अपघातांची मालिका आणि यात कुटुंबीय आपल्या चिमुरड्यांचा जीव धोक्यात टाकत आहेत.
घरकुलात राहण्यास येण्याअगोदर अनेक रहिवाशांनी ठिकठिकाणी दुकानांचे फलक लावण्याची घाई केली आहे.

Web Title: ..happy pet feet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.