मूठभर धान्याने ढेबे आजींना जगण्याचे बळ!

By Admin | Updated: October 12, 2015 01:29 IST2015-10-12T01:29:51+5:302015-10-12T01:29:51+5:30

‘‘आपलं या जगात कुणीच नाय. दिस कसाबसा ढकलत हाय. पर गुरुजी, तुमच्या मूठ मूठ दाण्यांनी मलाबी जगण्याची आशा दावलीया..

A handful of grains in the grass! | मूठभर धान्याने ढेबे आजींना जगण्याचे बळ!

मूठभर धान्याने ढेबे आजींना जगण्याचे बळ!

भोर : ‘‘आपलं या जगात कुणीच नाय. दिस कसाबसा ढकलत हाय. पर गुरुजी, तुमच्या मूठ मूठ दाण्यांनी मलाबी जगण्याची आशा दावलीया... जवळची कोणबी इचारत नसलं म्हणून काय झालं, आज माझी काळजी घेणारं चांगलं पाच-पंचवीस नातू मिळाल्यात. लय आनंद झालाय...’’ अशी डोळ्यांत अश्रू आणणारी प्रतिक्रिया दिली ती ढेबे आजींनी.
तालुक्याच्या हिरडस मावळ खोऱ्यातील दुर्गम डोंगरी भागात वसलेल्या निवंगण गावात धनगर समाजाच्या या आजी हलाखीचं जीवन जगत आहेत. भागाबाई धोंडीबा ढेबे असे त्यांचे नाव.
दिवसभरात भोर आगाराच्या अनियमित धावणाऱ्या दोन बस वगळता, शहरासाठी या गावाचा फारसा संपर्क येत नाही. भातशेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. आर्थिक परवड येथील लोकांच्या पाचवीलाच पुजलेली. गावात नुकतीच भोर एज्युकेशन संस्थेने शाळा सुरू केली आहे. समीर सहस्रबुद्धे हे शिक्षक येथे नवीनच रुजू झाले आहेत.
चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरलेल्या सत्तरी पार केलेल्या या आजीबाई ८ ते ९ वर्षांच्या चिमुकल्याबरोबर दिसत. समीर यांनी शाळेतील मुलांकडे चौकशी केली असता, त्यांच्या हलाखीचा परिचय झाला. ढेबे आजी त्यांच्या चिमुकल्या नातूबरोबर येथे जीवन कसंबसं जगत आहेत. पोटच्या मुलाचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. सूनही सोडून गेली. आणि दोन वर्र्षांच्या नातवाला सांभाळण्याची जबाबदारी ढेबे आजींवर आली. हे समजल्यानंतर समीर यांनी प्रत्येक मुलाला दर शनिवारी मूठभर तांदूळ आणण्यास सांगितले. चार आठवड्यांनंतर जमा झालेले ९ ते १० किलो तांदूळ ढेबेआजींना शाळेत बोलावून एका छोट्याशा कार्यक्रमात स्वाधीन केले. त्या वेळी आजींनी त्यांच्या जीवनाची ही चित्तरकथा ऐकवली आणि सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आलं. या वेळी संस्थेचे सचिव समीर वाकणकर, सुनील देशपांडे, प्रा. विक्रम शिंदे, शिक्षक गणेश पांगुळ, सरपंच किसन दिघे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: A handful of grains in the grass!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.