अनधिकृत इमारतींवर शुक्रवारपासून हातोडा
By Admin | Updated: September 2, 2015 04:15 IST2015-09-02T04:15:46+5:302015-09-02T04:15:46+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली

अनधिकृत इमारतींवर शुक्रवारपासून हातोडा
पिंपरी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरात सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करा, बांधकामे सुरू असतील, तर त्यांना नोटिसा द्या, गुन्हे दाखल करा, कारवाईकरा,असे आदेश महापालिकेतील अधिकाऱ्यांना दिले आहेत. अनधिकृत बांधकांमाविरोधातील मोहीम चार सप्टेंबरपासून तीव्र केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा विषय सध्या गाजत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ६६ हजार ३२४ अनधिकृत बांधकामेपाडापाडीची मोहीम तीव्र केली होती. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या मोहिमेत काही प्रमाणात संथपणा आल्याने शहरातील विविध भागांत अनधिकृत बांधकामे जोरात सुरू झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. लोकमतनेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन आयुक्त जाधव यांनी मंगळवारी सकाळी दहाला अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या जोरदार अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. याबाबत तक्रारी आल्या आहेत. याबाबत आयुक्तांनी बांधकाम परवाना आणि अतिक्रमणविरोधी पथक, स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. सुरू असणाऱ्या बांधकामांवरील कारवाईचा जोर वाढवा, असे
आदेश दिले. (प्रतिनिधी)