दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणांवर हातोडा
By Admin | Updated: July 5, 2015 00:25 IST2015-07-05T00:25:47+5:302015-07-05T00:25:47+5:30
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर सासवड येथे सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर कारवाई करीत अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्या पाडण्यात आल्या. दरम्यान, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे

दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणांवर हातोडा
सासवड : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर सासवड येथे सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर कारवाई करीत अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्या पाडण्यात आल्या. दरम्यान, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मेहुण्याच्या श्रीनाथ बियर शॉपीसमोरील पत्र्याचे शेड काढण्यास टाळाटाळ केल्याने राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी रस्ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर केला.
अधिकाऱ्यांनीही हे शेड काढण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास घालविले. त्यामुळे कारवाई करायची असेल तर सलग करा अन्यथा कारवाई करू देणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतल्यानंतर मीटर पट्टीने अंतर मोजून अखेर बांधकाम पाडण्यात आले. त्यानंतर पुढील अतिक्रमण काढले .
या मोठ्या कारवाईबद्दल सर्वसामान्य नागरिक, स्थानिक रहिवासी, वाहनचालक यांनी स्वागत केले आहे. तसेच एकदा रस्ता मोकळा केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, बांधकामे होणार नाहीत याची रस्ते बांधकाम विभागाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
या बरोबरच सोमवारी जेजुरी, त्यानंतर वाल्हे, नीरा येथे मोठी कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढावीत. अन्यथा एकदा कारवाई सुरु केल्यास पुन्हा थांबविण्यात येणार नाही.
या कारवाईमध्ये सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता विजयकुमार ठुबे यांच्याबरोबर उपभियांता डी. के. इंगळे, ज्ञानेश्वर हुंडेकरी, रमेशकुमार ताठे, पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक सुरेससिंग गौड, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे, नारायण गिते, ए. एस. टापरे, राजगडचे पोलीस उपनिरीक्षक
शेवते, सहायक फौजदार, पोलीस हवालदार असे एकूण ३५ कमर्चारी, त्याचप्रमाणे सासवडचे मंडल अधिकारी मनीषा भूतकर, तलाठी डी. एम. देवकर, हमीद शेख आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
आम्ही कोणाच्याही दबावाखाली काम करीत नाही अथवा कोणाला पाठीशीही घालण्याचा प्रश्न येत नाही. वास्तविक पाहता रस्ता मोकळा होणे ही सर्वांसाठी महत्त्वाची बाब आहे. बांधकामे पडताना कोणी विनंती केल्यास नुकसान होऊ नये म्हणून काही काळ सवलत दिली जात आहे. त्यातूनही त्याने अतिक्रमण स्वत:हून न काढल्यास थेट कारवाई करण्यात येत आहे. तसेच सासवडमधील संपूर्ण कारवाईमध्ये कुठेही राजकीय हस्तक्षेप झाला नाही. तसेच कारवाई करताना कोणीही राजकीय व्यक्तींनी तसे सांगितलेदेखील नाही.
- विजयकुमार ठुबे, विभागीय अभियंता,
सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग