पुणे : हमाल पंचायतीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या हमाल पंचायतीची निर्मिती ज्या कारणासाठी झाली ती जबाबदारी आता वाढली आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून हे काम राष्ट्रीय पातळीवर कसे नेता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे, असे मत हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी व्यक्त केले.हमाल पंचायतच्या वतीने मातोश्री बबुताई आढाव यांच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त कष्टाची भाकर उपक्रमातील आदर्श स्त्री-पुरुष कामगार पुरस्कार वितरण समारंभाचे हमाल पंचायत कष्टाची भाकर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी मधुकर झेंडे, महात्मा फुले प्रतिष्ठानचे काका पायगुडे, सुबराव बनसोडे उपस्थित होते. या वेळी सुभाष भरेकर व गहूबाई कोंद्रे यांना आदर्श कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झेंडे म्हणाले, की समाजाच्या हितासाठी काम करायचे असेल तर जातीय सलोखा ठेवला पाहिजे. तसेच हिंदू-मुस्लिम असा भेदभाव न करता एकत्र येऊन एकमेकांच्या उन्नतीसाठी काय करता येईल असा सर्वांगीण विचार करून शिक्षण, आरोग्य अशा सामाजिक समस्या सोडवल्या पाहिजेत. (प्रतिनिधी)