निम्म्या अंगणवाड्यांना हक्काचे छतच नाही
By Admin | Updated: February 24, 2015 23:15 IST2015-02-24T23:15:33+5:302015-02-24T23:15:33+5:30
नवीन वर्षात जिल्ह्यातील आंणगवाड्यांचा कायापालट करून त्या आनंदवाड्या करण्याचा ध्यास जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असला तरी जिल्ह्यातील जवळपास निम्म्या अंगणवाड्यांना

निम्म्या अंगणवाड्यांना हक्काचे छतच नाही
बापू बैैलकर, पुणे
नवीन वर्षात जिल्ह्यातील आंणगवाड्यांचा कायापालट करून त्या आनंदवाड्या करण्याचा ध्यास जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असला तरी जिल्ह्यातील जवळपास निम्म्या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. ४५७0 पैकी २३३४ अंगणवाड्यांना इमारत आहे, तर २२३९ ठिकाणी इमारत नाही.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाड्यांचे ‘रूप’ बदलण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे. मुलांना युनिफॉर्म, आयकार्ड, शूज, सॉक्स, बसण्यासाठी बेबी चेअर देण्यात येत आहेत. काही शाळांमध्ये लोकसहभागातून टीव्ही व डीव्हीडी दिले आहेत.
मात्र, २२३९ अंगणवाड्या इमारतीविना आहेत. येथील शाळा या समाजमंदिर, खासगी शाळा, मंदिर, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व इतर ठिकाणी भरत आहेत. ८४ अंगणवाड्यांना जागाच उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे.
२0१0 पासून आतापर्यंत अंगणवाड्यांसाठी ४७६९.९३ लाख इतका निधी मिळाला आहे. त्यातील ४३४९.९३ लाख इतका निधी खर्च झाला असून ९२६ इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत. ३८७ इमारतींची कामे प्रगतिपथावर असल्याचे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य अधिकारी मुंढे यांनी सांगितले.
अंगणवाड्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३९0२ लाख, १३ व्या वित्त आयोगातून ३७५ लाख, तर आदिवासी उपयोजनांतर्गत ४९२.९३ लाख असा ४७६९.९३ लाख इतका निधी मिळाला आहे. यातून १३१३ इमारतींचे उद्दिष्टांपैकी ९२६ इमारती पूर्ण झाल्या, तर ३८७ इमारतींची कामे प्रगतिपथावर आहेत. २0१४-१५ मधील जिल्हा वार्षिक नियोजनातून ४२0 लाख इतका निधी मंजूर असून, यातून २२५ इमारतींचे उद्दिष्ट आहे. मात्र अद्याप एकही इमारत पूर्ण झाली नाही. सर्व कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले. २0१५-१६ साठी १६५0 लाखांची मागणी जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
महिला बालकल्याणच्या सभापती वंदना धुमाळ यांनी , लोकसहभागातून अंगणवाड्यांचे रूप बदलण्याचा प्रयत्न असून जास्तीत जास्त इमारती पूर्ण करण्याचा आमचा प्र्रयत्न असल्याचे सांगितले.