गारपिटीने शेतकरी कोलमडला

By Admin | Updated: April 11, 2015 22:48 IST2015-04-11T22:48:33+5:302015-04-11T22:48:33+5:30

जिल्ह्याला गारपिटीचा फटका बसणार हा हवामान खात्याचा अंदाज शनिवारी खरा ठरला. शनिवारी दुपारी शिरूर, दौंड, पुरंदर व इंदापूर तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली.

The hailstorm hit the farmer | गारपिटीने शेतकरी कोलमडला

गारपिटीने शेतकरी कोलमडला

पुणे : जिल्ह्याला गारपिटीचा फटका बसणार हा हवामान खात्याचा अंदाज शनिवारी खरा ठरला. शनिवारी दुपारी शिरूर, दौंड, पुरंदर व इंदापूर तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली. त्याचा सर्वाधिक फटका डाळिंब उत्पादकांना बसला आहे. टाकळी हाजी परिसरात शिनगरवाडी, म्हसे परिसरात तसेच इंदापूर व पुरंदर तालुक्यांतही डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शिनगरवाडी परिसरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या अवकाळीने शेतकऱ्यांची धांदल उडविली. गारांचा आकारही मोठा होता. शेतात काम करणारे मजूर गारांचा मारा वाचविण्यासाठी सैरावैरा धावत होते. ऊस, कांदा, उन्हाळी बाजारी, चारा पिके, मिरची टोमॅटो व द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले.

वालचंदनगर : वालचंदनगर परिसराला शनिवारी (दि. ११) दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. कळंब, चिखली, भोरकरवाडी, धवलपुरी, लालपुरी, रत्नपुरी, रणगाव, शिरसटवाडी, जंक्शन, बोरी आदी गावांचा त्यामध्ये समावेश होता. अवकाळी पावसाच्या सरी कोसळून रस्त्यावरून पाणी वाहत होेते.
अचानक साडेअकराच्या सुमारास इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात ढगाळ हवामान निर्माण झाले, तर कळंब, चिखली, कुरवली परिसरात मध्यम स्वरूपाचे वादळ झाले. थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला या भागात हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. त्यानंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने रत्यावरील प्रवाशांची त्रेधा तिरपीट उडवली. या पावसाचा वीटभट्टी व्यावसायिकांनी धसका घेतला आहे. ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्याभोवती पाणी साठले होते. विजांच्या कडकडाटही मोठा होता. रणगाव परिसरात वादळी वाऱ्याने आंब्याच्या कैऱ्या पडल्या. वालचंदनगरच्या शहरी भागात रस्त्यावरून पाणी वाहून सखल भागात जागोजागी पाणी साठले. अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. शेतकऱ्यांना हातातील कामे बंद करावी लागली. संततधार पाऊस सुरूच होता. पावसाने वीजपुरवठा खंडित झाला होता.
निमगाव केतकी : परिसरात अवकाळी पावसाने आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक हजेरी लावली. या पावसाने बाजारकऱ्यांची धांदल उडाली. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वारा येऊन हलकासा पाऊस पडला. यामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली. यामुळे भाजीपाल्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शनिवारी येथील आठवडेबाजार असतो. या दिवशी परिसरातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतातील भाज्या फळे विक्रीसाठी बाजारामध्ये घेऊन येतात.
याबरोबरच मिठाईवाले तसेच वेगवेगळे व्यावसायिक संसारोपयोगी वस्तू विकण्यासाठी बाजारात येतात. या सर्वांनाच अचानक आलेल्या पावसाचा फटका बसला. येथील बाजार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चांगला भरतो. हा बाजार संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालतो. याबरोबरच बाजारसाठी आलेल्या बाजरकऱ्यांनाही याचा फटका सहन करावा लागला.

४खळद : पुरंदर तालुक्याला शनिवारी अवकाळी पावसाने झोडपले. या वेळी अनेक भागांत तुफान गारांचा पाऊस झाल्याने फळबागांना मोठा फटका बसला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
४दिवेघाट, झेंडेवाडी, काळेवाडी, दिवे, पवारवाडी, सोनोरी, वनपुरी, उदाची वाडी, सोनोरी, आंबोडीसह परिसरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले. खळद, वाळुंज ,निळुंज, शिवरी या भागातही गारांचा फटका बसला. या पावसाबरोबर वादळी वारे जोरदार होते. या वाऱ्यामुळे या परिसरातील अंजीर, सीताफळ, डाळिंबासह फळबागांना, कांद्यासह भाज्यांनाही मोठा फटका बसला. त्याचबरोबर आंब्याच्या पिकांनाही फटका बसला असून या भागात घरच्या आंब्याची चव चाखायाला मिळू शकणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
४याबाबत सोनोरी येथील गणेश मोरे यांनी सांगितले, की या भागात गारांचे प्रमाण एवढे होते, की सर्वत्र गारांचा खच पडल्याचे दिसत होते. शेतातील प्रचंड नुकसानाबरोबरच अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडाले, विजेचे खांब पडले.

४जेजुरी : जेजुरी शहर व परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या आहेत. दोन दिवसांपासून जेजुरी परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली.
४जेजुरीच्या पश्चिमेकडील साकुर्डे, बेलसर, तक्रारवाडी, कोथळे, धालेवाडी, नाझरे, जवळार्जुन, जेजुरी औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली, बेलसर, नाझरे परिसरात गाराही पडल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांत साकुर्डे, जेजुरी परिसरात एकूण १०० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या परिसरात गेल्या तीन वर्षांत सर्वात जास्त पाऊस पडला आहे. परिसरातील शेतातून ताली भरल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्तहोत आहे.

बारामतीत हलक्या सरी
४बारामती : बारामती शहरात दुपारी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता. सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान होते.दुपारी एक नंतर पावसाला अचानक सुरूवात झाली.या पावसाने रस्ते ओलेचिंब झाले होते.उकाड्याने हराण झालेल्या बारामतीकरांना या पावसाने दिलासा मिळाला. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, निमसाखर, परिसरात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली.

कळंबमध्ये गारांसह पाऊस
४कळंब : कळंब ( ता. इंदापूर ) येथे शनिवारी (दि. ११ ) दुपारी २ वाजता पावसाने गारांसह सुमारे अर्धा तास जोरदार हजेरी लावली . गारांच्या पावसामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले आहे.
४सततच्या अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसामुळे तरकारी पिकांवर मोठ्याप्रमाणात रोग येतील, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली, तर केळीच्या बागांना करप्याचा प्रादुर्भाव होणार आहे.

४इंदापूर : शनिवारी दुपारी सुरवड (ता.इंदापूर) येथे झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने केळी व डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. इंदापूर-अकलूज रस्त्यावर सुबाभळीची झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबली होती. आज दुपारपासून आभाळ आले होते.शहर परिसरात हीच स्थिती होती.अडीच ते पावणेतीन वाजण्याच्या सुमारास सुरवड भागात वादळी पाऊस व गारपीट सुरू झाली.
४अर्ध्या तासात पिकांचे पुरेसे नुकसान करून पाऊस परतला. सुरवड येथील शेतकरी अंकुश तात्याबा बनसुडे यांच्या एकर क्षेत्रातील केळीचे मोठे नुकसान या गारपिटीने झाले आहे.दोन एकर क्षेत्रातील डाळिंबाच्या कळ्या,फुले गळून
पडली आहेत.

Web Title: The hailstorm hit the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.