दक्षिण भागात गारांचा गारवा
By Admin | Updated: May 9, 2017 04:16 IST2017-05-09T04:13:58+5:302017-05-09T04:16:52+5:30
वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या शहरातील दक्षिण भागातील नागरिकांना सोमवारी अचानक आलेल्या पावसाने दिलासा मिळाला़

दक्षिण भागात गारांचा गारवा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या शहरातील दक्षिण भागातील नागरिकांना सोमवारी अचानक आलेल्या पावसाने दिलासा मिळाला़ कात्रज, धायरी, नऱ्हे, वडगाव, डोणजे, नांदेड सिटी, नांदेडगाव, खडकवासला परिसरात गारांसह जोरदार पाऊस झाला़
गेले काही दिवस शहरातील कमाल व किमान तापमानात सातत्याने वाढ होत होती़ शुक्रवारी ५ मे रोजी शहरात या हंगामातील सर्वाधिक ४१़१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती़ त्याचवेळी रात्रीचे तापमानही २५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते़ त्यानंतर आता काहीशी घट झाली आहे़
शहरातील काही भागात आकाश सकाळपासूनच अधूनमधून ढगाळ होते़ सायंकाळच्या सुमारास अचानक काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली़ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गारांसह पाऊस पडण्यास सुरुवात झाली़ या हंगामातील शहरातील दक्षिण भागातील पहिलाच पाऊस असल्याने अनेकांनी त्यात भिजण्याचा आनंद लुटला़ त्यातच मुले गारा गोळा करण्यासाठी धावाधाव करताना दिसत होते़ साधारण १० मिनिटे गारांसह पाऊस पडला़ कात्रज येथील आशय मेजरमेंटस या संस्थेच्या हवामान केंद्रात सायंकाळपर्यंत ४़५ मिमी पावसाची नोंद झाली होती़