हडपसर-जेजुरी महामार्ग रखडलेलाच!

By Admin | Updated: December 23, 2016 00:05 IST2016-12-23T00:05:47+5:302016-12-23T00:05:47+5:30

जमीन संपादनाला झालेला विरोध, ठेकेदाराने केलेली अर्धवट कामे, रखडलेली बिले आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे

The Hadapsar-Jejuri highway is still missing! | हडपसर-जेजुरी महामार्ग रखडलेलाच!

हडपसर-जेजुरी महामार्ग रखडलेलाच!

जेजुरी : जमीन संपादनाला झालेला विरोध, ठेकेदाराने केलेली अर्धवट कामे, रखडलेली बिले आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे २००८ मध्ये सुरू झालेल्या हडपसर-जेजुरी या ४१ महामार्गाचे काम गेल्या आठ वर्षांपासून रेंगाळलेले आहे. या अर्धवट कामांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला असून, अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रकल्प रेंगाळल्याने नियोजित रकमेत वाढ झाली आहे.
हडपसर-जेजुरी या मार्गावर वेग वाहतुकीसाठी तसेच पालखीमार्गाचा विकास करण्यासाठी २००८ रोजी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा याअंतर्गत या मार्गाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, या रस्त्याच्या विकासात सुरुवातीपासूनच विघ्न येत गेले. महामार्गालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई न मिळाल्याने त्यांचा या रस्त्याच्या कामाला विरोध होता.
सन २००७ साली तत्कालीन आमदार अशोक टेकवडे यांनी तालुक्यातील मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण करतानाच हडपसर ते जेजुरी या महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे म्हणून प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. २००८ साली या कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या तत्त्वावर वेगाने कामाला सुरुवातही झाली. ठेकेदाराने फुरसुंगी, झेंडेवादी, दिवे, काळेवाडी, सासवड, बोरावकेमळा, शिवरी, वाळूंज, तक्रारवाडी, साकुर्डे,जेजुरी या परिसरात मार्गाचे रुंदीकरण केले. मात्र, नंतर विरोधामुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे काम रेंगाळत गेले.
दरम्यान, तालुक्यात सत्ताबदल झाला, सुरुवातीला सेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी ही या मार्गाच्या कामात लक्ष घातले. मात्र, काही ठिकाणी मार्गालगतच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचा तसेच नागरिकांचा जमिनींच्या भूसंपादनास विरोध राहिल्याने काम ठप्पच झाले. शासनाकडूनही शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही काम थांबवण्याचे आदेश दिले. गेल्या ३ वर्षांपासून चौपदरीकरणाचे कामच बंद झालेले आहे. गेल्या ३ वर्षांपासून मात्र या मार्गाच्या रखडलेल्या कामाकडे दुर्लक्षच झालेले आहे.
दरम्यान, रखडलेला महामार्ग आणि ठिकठिकाणी अर्धवट राहिलेल्या कामामुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक व अपघातग्रस्त झाला आहे. दररोज या मार्गावर लहान-मोठे अपघात होत आहे. या अर्धवट कामामुळे झालेल्या अपघातात काहींना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. याबाबत लोकमतनेच वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत या मार्गाच्या दुरुस्तीसाठी शासनाने तब्बल ४५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही मार्गाची पूर्णपणे दुरुस्ती झालेली नाही. सुरुवातीला शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी देऊन मार्गावरील अतिक्रमणे, शक्य आहे तेथे रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम केले. फुरसुंगी, सासवड, जेजुरी आदी ठिकाणची अतिक्रमणे काढून रुंदीकरण झाले. यातील अजूनही जेजुरी व काही ठिकाणचे डांबरीकरण झालेले नाही. ठेकेदार देशमुख अँड कंपनी यांनी ते काम सुमारे २५ टक्के बिले घेतल्याने कामही सुमारच झालेले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला शासनाने आणखी ३० कोटींचा निधी मार्गाच्या दुरुस्तीसाठी दिला आहे. मात्र, दुरुस्त्या अपूर्णच राहिलेल्या आहेत. मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या दुरुस्त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. मध्यंतरी पालखी सोहळ्यापूर्वी दिवेघाट, तसेच ज्या ठिकाणी मार्ग उखडलेला आहे, त्या ठिकाणचे डांबरीकरण करण्यात आले. तसेच मार्गावरील अरुंद भरावांना संरक्षक कठडे तेवढे बसवण्यात आले आहेत.
पालखी सोहळ्यानंतर हे कामही ठप्पच झालेले आहे. याबाबत थेट ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी, काम पूर्ण करण्यासाठी अजून दोन महिन्यांची मुदत आहे. या काळात काम पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र शासनाकडे आमचे केलेल्या कामाचे सुमारे साडेचार कोटींचे बिल रखडलेले आहे. ते अजूनही मिळू शकलेले नाही. शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगितले.(वार्ताहर)

Web Title: The Hadapsar-Jejuri highway is still missing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.