अन् पवारांना आठवला गुरुजींचा ‘बुक्का!’

By Admin | Updated: October 27, 2015 00:51 IST2015-10-27T00:51:44+5:302015-10-27T00:51:44+5:30

राजकीय विश्वामध्ये भल्याभल्यांना धोबीपछाड देणारे आणि सहसा कुणाच्या हाती न लागणारे शरद पवार यांना त्यांच्या बालपणी शिक्षकांनी पाठीत घातलेल्या बुक्क्याची आठवण मात्र आजही ताजी आहे.

Guruji's 'Bukka'! | अन् पवारांना आठवला गुरुजींचा ‘बुक्का!’

अन् पवारांना आठवला गुरुजींचा ‘बुक्का!’

बारामती : राजकीय विश्वामध्ये भल्याभल्यांना धोबीपछाड देणारे आणि सहसा कुणाच्या हाती न लागणारे शरद पवार यांना त्यांच्या बालपणी शिक्षकांनी पाठीत घातलेल्या बुक्क्याची आठवण मात्र आजही ताजी आहे. ‘‘आजही पाठ दुखायला लागली की वाघमारे गुरुजींची आठवण येते’’ असे सांगत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपल्या बालपणीच्या आठवणीत आज रमले.
निमित्त होते, मएसो इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळ्याचे. पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शाळेतल्या अनेक आठवणींना त्यांनी दिलखुलासपणे उजाळा दिला.
पवार म्हणाले, काटेवाडी (ता. बारामती) येथे वास्तव्यास असताना प्राथमिक शिक्षण येथील प्राथमिक शाळेत घेतले. या वेळी शिक्षण घेताना तेथील वाघमारे गुरुजी कडक शिस्तीचे. ते शिस्त लावण्यासाठी आम्हाला मान खाली घालून पाठीत बुक्का मारत. आजही पाठ दुखायला लागल्यावर त्यांची आठवण येते. मएसोच्या बी. जी. घारे सरांचा विद्यार्थ्यांमध्ये दरारा होता. त्यांचे नाव घेतले तरी विद्यार्थ्यांचा थरकाप उडत असे. तर निलांबरी वाटवे या गुणी शिक्षिका होत्या. त्यांची मुलगी आसावरी माझ्या वर्गात होती. ती अधूनमधून भेटत असते, अशी आठवण सांगितल्यानंतर तर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
पदाने मोठे झाल्यानंतरही ज्ञानी माणसांपुढे नतमस्तक व्हायचे असते असा मोलाचा सल्ला देत पवार म्हणाले, ही जाणीव ठेवून मी राजकीय जीवनात वाटचाल केली. संरक्षणमंत्री पदावर काम करताना सेनादलातील निवृत्त अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. याचा महत्त्वपूर्ण उपयोग झाला. ज्ञान, समृद्धी आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षक पुढाकार घेतात. मएसोच्या शिक्षण संस्थेत हाच वसा शिक्षकांनी जपला. त्यामुळे अनेकांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यातून बारामतीच्या इतिहासात मएसोचे नाव घेतले जाते. या इंग्रजी शाळेसाठी ५ कोटी रुपये किमतीची १ एकर जमीन देणाऱ्या हरिभाऊ देशपांडे यांचे पवार यांनी कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
या वेळी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष हरिभाऊ देशपांडे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, सचिव डॉ. संतोष देशपांडे, नियामक
मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, मुख्याध्यापिका ज्योती क्षीरसागर, मुख्याध्यापक भगवानराव
चव्हाण उपस्थित होते. आभार मएसोचे डॉ. भरत व्हनकटे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Guruji's 'Bukka'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.