पालकमंत्र्यांनी काढली नाराजांची समजूत
By Admin | Updated: February 5, 2017 03:43 IST2017-02-05T03:43:17+5:302017-02-05T03:43:17+5:30
उमेदवारी देण्यावरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांत निर्माण झालेला प्रक्षोभ दूर करण्यासाठी

पालकमंत्र्यांनी काढली नाराजांची समजूत
पुणे : उमेदवारी देण्यावरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांत निर्माण झालेला प्रक्षोभ दूर करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांना धाव घ्यावी लागली. नाराज कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांची समजूत काढली.
नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी सायंकाळी आंदोलन केले होते. पक्षात बाहेरून आलेल्या अनेकांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षाचे अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते उमेदवारीपासून वंचित राहिले होते. अशा सर्व नाराज कार्यकर्त्यांची बापट यांनी भेट घेतली. याबाबत बोलताना ते म्हणाले,‘‘ इतर पक्षातील उमेदवारांना तिकीट देणे हा एक राजकीय डावपेचाचा भाग आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी ही राजकीय गणिते मांडावी लागतात. इतर पक्षातून आलेल्या फक्त ७ ते ८ उमेदवारांना तिकीट दिले असल्याने पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय झाला, असे म्हणता येणार नाही. ’’ गेल्या २५ वषार्पासून शिवसेना हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. युती झाली नसली तरी, निवडणुकीनंतर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी युती करावी लागली तर शिवसेनेलाच प्राधान्य असेल असे बापट म्हणाले. प्रचारात शिवसेनेवर काहीही टीका करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.