विद्यार्थी वाहतुकीसाठी बससंख्येत वाढ
By Admin | Updated: June 16, 2015 00:17 IST2015-06-16T00:17:43+5:302015-06-16T00:17:43+5:30
विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) यंदा खास विद्यार्थ्यांसाठी बसेसमध्ये वाढ केली आहे.

विद्यार्थी वाहतुकीसाठी बससंख्येत वाढ
पिंपरी : विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) यंदा खास विद्यार्थ्यांसाठी बसेसमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर होणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक मोठ्या शाळा आहेत. या शाळांतील अनेक विद्यार्थी ये-जा करण्यासाठी पीएमपीच्या बसला पसंती देतात. पीएमपीमार्फत खास विद्यार्थ्यांसाठी बस सोडल्या जातात. मात्र, बसेसच्या फेऱ्या अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना इतरांबरोबरच गर्दीतून वाट काढत बसने प्रवास करावा लागतो.
या गर्दीत अनेकदा विद्यार्थ्यांचे हाल होतात. धोका पत्करून दरवाजाला लटकत प्रवास करतानाही विद्यार्थी दिसतात. विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी पीएमपीने येत्या शैक्षणिक वर्षात जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दररोज काही मार्गांवर आठ जादा बस म्हणजे १६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मागील वर्षी खास विद्यार्थ्यांसाठी ४० बस सोडल्या जात होत्या. त्यामध्ये आता आणखी आठ बसेसची भर पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोंबकळत प्रवास करावा लागणार नाही. तसेच वेळेवर बस उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे म्हणाले, साधारणपणे टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, कर्वे रस्ता आणि अन्य काही मार्गांवर सकाळी व सायंकाळी बसस्थानकांवर विद्यार्थ्यांची गर्दी होते.
पीएमपीमार्फत खास विद्यार्थ्यांसाठी जादा बस सोडल्या जातात. मात्र, मागील वर्षीपर्यंत ही संख्या अपुरी होती. या वर्षी या बसेसमध्ये वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)