महापौरपदावरून गटबाजी

By Admin | Updated: March 11, 2017 03:19 IST2017-03-11T03:19:44+5:302017-03-11T03:19:44+5:30

महापौरपद भोसरीला मिळणार, की चिंचवडला या वादावर पडदा पडला असला, तरी महापौरनिवडीमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने भाजपात गटबाजी सुरू झाली आहे.

Grouping on the Mayor's post | महापौरपदावरून गटबाजी

महापौरपदावरून गटबाजी

पिंपरी : महापौरपद भोसरीला मिळणार, की चिंचवडला या वादावर पडदा पडला असला, तरी महापौरनिवडीमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने भाजपात गटबाजी सुरू झाली आहे. महापौर व पक्षनेते निवडीत भोसरीला झुकते माप दिल्याने स्थायी समिती अध्यक्षपद तरी चिंचवडच्या वाट्याला येणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
महापालिकेत सत्तांतर झाले आहे. भाजपाची एकमुखी सत्ता आली. सध्या भाजपात खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अ‍ॅड. सचिन पटवर्धन, आझम पानसरे असे प्रमुख गट आहेत. उमेदवारीपासून ते महापौर निवडीपर्यंत, फ्लेक्सबाजीपासून श्रेयवादापर्यंत भाजपातील गटबाजी वेळोवेळी उफाळून आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिल्याने महापौरपदाची निवडणूक होणार आहे. महापालिकेत भाजपाच्या एकूण ७७ जागा आहेत. एकहाती सत्ता असल्याने महापौर हा भाजपाचाच होणार आहे. निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे. गटबाजी होऊ नये, म्हणून महापौरपदाचा उमेदवार देतानाही कमालीची गुप्तता पाळली.
महापौर निवडीबाबतही चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे नगरसेवक नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, भोसरीतून नितीन काळजे, संतोष लोंढे, पिंपरी विधानसभा मतदारसंघातून केशव घोळवे यांच्या नावाची चर्चा होती. जुन्या कार्यकर्त्यांना पद वाटपात न्याय द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, भोसरीकरांनी दबाव तंत्र अवलंबल्याने भाजपाचा पहिला महापौर होण्याचा मान नितीन काळजे यांना मिळणार आहे. स्थानिक नेत्यांच्या दबावतंत्रामुळे भाजपात अस्वस्थता आहे.
महापौर निवडीनंतर स्थायी समिती अध्यक्षपद कोणास मिळणार याची उत्सुकता आहे. हे पद चिंचवड विधानसभेला मिळावे, यासाठी जगताप समर्थक आग्रही आहेत. तसेच कोणत्या गटाच्या किती सदस्यांना स्थान द्यायचे, यावर भाजपा नेत्यांत चर्चा होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)

नितीन काळजे यांच्या विरोधात याचिका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. भारतीय जनता पक्षाने मराठा कुणबी उमेदवार नितीन काळजे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मूळ ओबीसींमध्ये नाराजी आहे. काळजे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा दावा करून माजी नगरसेवक घनश्याम खेडकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, ओबीसी संघर्ष समितीने पिंपरीत आंदोलनही केले.
महापालिका निवडणुकीत १२८ पैकी भारतीय जनता पक्षाचे ७७ नगरसेवक निवडून आले आहेत. या वर्षी महापौरपद इतर मागासवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महापौरपदी मूळ ओबीसी असणाऱ्या नगरसेवकाला संधी देईल, अशी ओबीसींना अपेक्षा होती.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नामदेव ढाके, भोसरीतून संतोष लोंढे, राहुल जाधव आणि केशव घोळवे यांच्यापैकी एकाला महापौरपद मिळणार, असे मानले जात होते. मात्र, भाजपाने कुणबी ओबीसी असलेल्या काळजे यांना संधी दिल्याने मूळ ओबीसी समाजांमध्ये नाराजी पसरली आहे.
पिंपरीतील महात्मा फुले पुतळ्याजवळ सायंकाळी ओबीसी संघर्ष समितीने बैठक घेतली. भाजपाच्या निर्णयाचा निषेध केला. या वेळी अध्यक्ष प्रताप गुरव, विष्णू निचळ, पी. के. महाजन, आनंदा कुदळे, हनुमंत माळी, महेश भागवत, रमेश सोनवणे, पुंडलिक सैंदाणे आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक घनश्याम खेडकर यांनी नितीन काळजे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Grouping on the Mayor's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.