पाच कुत्र्यांच्या टोळीने मारली चार काळविटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST2021-01-08T04:25:58+5:302021-01-08T04:25:58+5:30
श्रीकिशन काळे पुणे : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात काळविटांच्या खंदकात घुसलेल्या पाच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार काळविटांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी ...

पाच कुत्र्यांच्या टोळीने मारली चार काळविटे
श्रीकिशन काळे
पुणे : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात काळविटांच्या खंदकात घुसलेल्या पाच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार काळविटांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी (दि. ६) पहाटे निदर्शनास आले. प्राणिसंग्रहालयाच्या पडक्या कुंपणातून ही कुत्री आत घुसल्याचा अंदाज आहे. हल्लेखोर चार कुत्र्यांना पकडण्यात आले आहे.
प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांना सकाळी चार काळविटे मेलेल्या अवस्थेत आढळून आली. आजूबाजूला शोध घेतल्यावर भटक्या कुत्र्यांची टोळी दिसली. कर्मचाऱ्यांनी या कुत्र्यांना लगेच पकडले. पण पाचपैकी एक कुत्रा पळून गेला. हा कुत्रा हरणांच्या खंदकात गेला आणखी मोठा अनर्थ होण्याची भीती आहे. त्यामुळे ‘सीसीटीव्ही’च्या मदतीने त्याचा शोध चालू आहे.
प्राणिसंग्रहालयात बिबट्याच्या खंदकाशेजारी काळविटांचे खंदक आहे. त्या खंदकापलीकडे कात्रज तलाव आहे. गेल्या वर्षी (२५ सप्टेंबर २०१९) खूप पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तेव्हा पाण्याला वाट करून देण्यासाठी प्राणिसंग्रहालयाच्या भिंतीला भगदाड पाडण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे कुंपण पूर्ववत न केल्याचा फटका काळविटांना बसला. या पडक्या भिंतीमधूनच भटक्या कुत्र्यांची टोळी काळविटांच्या खंदकात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.
चौकट
कायद्याने काळविटाला संरक्षण
प्रामुख्याने भारतात आढळून येणारे काळवीट हे कुरंग कुळातील प्रमुख हरीण आहे. नर काळवीट काळ्या रंगाचे असून मादी भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे नसतात. ही काळवीटं खूूूप घाबरट असतात. यांची शिकार करता येत नाही. सरकारने यांना ‘शेड्युल्ड १’ मध्ये समाविष्ट केले असून हा संकटग्रस्त प्राणी आहे.
चौकट
“आज सकाळी कुत्र्यांनी आत प्रवेश करून काळविटांचा चावा घेतला आहे. त्यात चार काळवीट मरण पावली आहेत. आम्ही सीसीटीव्ही पाहिला त्यात कुत्री दिसली. चार कुत्र्यांना पकडून भूल दिली. नंतर त्यांना प्राणिसंग्रहालयाबाहेर लांब सोडण्यात आले. नाल्याशेजारी सीमा भिंत आहे. तेथून ते आत घुसली असावीत, असा अंदाज आहे. ही भिंत त्वरित बांधण्याचा आदेश दिला आहे. या घटनेचा अहवालही मागविला आहे.”
- कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका