ग्रीन कॉरिडॉरमुळे रुग्णाला जीवदान

By Admin | Updated: February 2, 2017 04:03 IST2017-02-02T04:03:01+5:302017-02-02T04:03:01+5:30

औरंगाबादमधील ४५ वर्षीय व्यक्ती अपघातामध्ये गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयाने मंगळवारी (दि. ३१) रात्री १० वाजता

Green corridor gives life to the patient | ग्रीन कॉरिडॉरमुळे रुग्णाला जीवदान

ग्रीन कॉरिडॉरमुळे रुग्णाला जीवदान

पुणे : औरंगाबादमधील ४५ वर्षीय व्यक्ती अपघातामध्ये गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयाने मंगळवारी (दि. ३१) रात्री १० वाजता रुग्णाला ब्रेनडेड घोषित केले. नातेवाइकांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे ग्रीन कॉरिडोरचा वापर करून यकृत तीन तासांत पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलला आणण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याने पुण्यातील रुग्णाला जीवदान मिळाले. या वर्षी औरंगाबादमधून पुण्यात यकृत आणण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पुणे झेडटीसीसीच्या प्रमुख आरती गोखले यांनी सांगितले.
याबाबत सांगताना सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. बिपिन विभुते म्हणाले, ‘मंगळवारी रात्री ११ वाजता झेडटीसीसीकडून औरंगाबादमधील व्यक्तीच्या यकृताबाबत माहिती मिळाली. त्याप्रमाणे, रात्री १२ वाजता डॉ. राहुल सक्सेना यांची टीम औरंगाबादला रवाना झाली. पहाटे ५ वाजता ही टीम औरंगाबादला पोचली. त्यानंतर, सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी रुग्णाचे यकृत शस्त्रक्रियेद्वारे शरीरातून काढण्यात आले.
बुधवारी सकाळी ९.३० वाजता ग्रीन कॉरिडोरचा वापर करून रुग्णवाहिकेने साधारणपणे ३ तास १० मिनिटांमध्ये ही टीम पुण्यात पोचली. त्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलपर्यंतचे १४.५ किमीचे अंतर १७ मिनिटांत पार करत १.०५ मिनिटांनी यकृत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पोचवण्यात
आले.’ पुण्यातील रुग्णाला रुग्णालयातर्फे एक महिन्यापूर्वी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला होता. या अवयवदानामुळे पुण्यातील रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि त्याला जीवदान मिळाले. (प्रतिनिधी)

- रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील ४५ वर्षीय व्यक्तीचा अपघात झाल्याने त्याला सिगमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा रुग्ण ब्रेन डेड झाल्याचे घोषित झाल्यानंतर मंगळवारी रात्री रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयवदान करण्याची परवानगी दिली. त्यानंतर राज्याच्या झोनल ट्रान्सप्लान्ट को-आॅर्डिनेशन सेंटरने (झेडटीसीसी) प्रतीक्षा यादीनुसार ब्रेन डेड रुग्णाचे यकृत पुण्याला रवाना केले.

Web Title: Green corridor gives life to the patient