ग्रीन कॉरिडॉरमुळे रुग्णाला जीवदान
By Admin | Updated: May 4, 2017 02:52 IST2017-05-04T02:52:59+5:302017-05-04T02:52:59+5:30
यकृतासाठी औरंगाबाद ते पुणे असा ग्रीन कॉरिडॉर तयार करून बुधवारी एका ४१ वर्षीय रुग्णाला जीवदान देण्यात आले.

ग्रीन कॉरिडॉरमुळे रुग्णाला जीवदान
पुणे : यकृतासाठी औरंगाबाद ते पुणे असा ग्रीन कॉरिडॉर तयार करून बुधवारी एका ४१ वर्षीय रुग्णाला जीवदान देण्यात आले. औरंगाबाद ते सह्याद्री रुग्णालय हे अंतर साडेतीन तासांत पार करून यकृत पुण्यात आणण्यात आले. 
रुग्णाच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव झाल्याने मेंदू मृत घोषित केल्यानंतर त्याचे अवयदान करण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णाला या यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली. 
सह्याद्री रुग्णालयाचे सर्जन डॉ. बिपीन विभुते म्हणाले, गेल्या तीन महिन्यांपासून ४१ वर्षांचा रुग्ण कर्करोग आणि यकृत सिरोसिस आजाराने ग्रस्त होता. यकृत प्रत्यारोपण हाच त्यावरील एकमेव पर्याय उरला होता. औरंगाबादमधील रुग्णालयाला अवयदानाविषयी माहिती कळविली आणि आमच्या टीमने रुग्णालयात जाऊन यकृत आणले. 
झोनल ट्रान्सप्लांट कॉरिडेनेशन सेंटर (झेटीसीसी) च्या समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, २ मे  रोजी एका ७४ वर्षीय वृद्धाचा  मेंदू मृत घोषित करण्यात  आल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याच्या कुटुंबीयांनी  त्यांचे अवयदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 
पुण्यातील रुग्णालयांशी  संपर्क साधल्यानंतर सह्याद्री रुग्णालयामध्ये असा रुग्ण  मिळाला. वाहतूक शाखेच्या सहकार्याने पुणे शहर, जिल्हा आणि औरंगाबाद असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला.