बाप्पांची वैभवशाली मिरवणूक
By Admin | Updated: September 29, 2015 02:23 IST2015-09-29T02:23:34+5:302015-09-29T02:23:34+5:30
संपूर्ण जगभरात आकर्षक असलेल्या पुण्यातील वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला यंदा सामाजिक जाणिवेचे भान होतेच़

बाप्पांची वैभवशाली मिरवणूक
पुणे : संपूर्ण जगभरात आकर्षक असलेल्या पुण्यातील वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला यंदा सामाजिक जाणिवेचे भान होतेच़ त्याचबरोबर राज्यातील दुष्काळ आणि पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर मानाच्या गणपती मंडळांनी यंदा हौदात विसर्जन करण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची सुवर्ण किनारही या विसर्जन मिरवणुकीला लाभली होती़ नेहमीप्रमाणे आपला सर्व डामडौल, परंपरा सांभाळत रविवारी सकाळी साडेदहा वाजता सुरु झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास ५५ मिनिटांनी सोमवारी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी सांगता झाली़
महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी रविवारी सकाळी साडेदहा वाजता पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण केला आणि मिरवणुकीला सुरुवात झाली़ आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पालखीत कसबा गणपती विराजमान झाला होता़ चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या ग्रामदेवता व दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरीचा गणपती पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी झाला़ त्यानंतर गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी मराठा गणपती मिरवणुकीत सहभागी झाले़ ढोल ताशाचा खेळ, मल्लखांबाचे सादरीकरण, ध्वजवंदनाचे जोरदार प्रात्याक्षिक तसेच अवयवदानाविषयी जनजागृती करणारे रथ मिरवणुकीत सहभागी झाले होते़ कसबा गणपतीची मिरवणुक तब्बल ५ तास २० मिनिटे चालली़ मानाच्या पाचही गणपतींचे हौदात विसर्जन झाले़ या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी हे हौद फुलांनी सजविण्यात आले होते़ मानाच्या गणपती पाठोपाठ आकर्षक देखावे असलेल्या मंडळांची मिरवणुकीत सहभागी होत होते़ (प्रतिनिधी)