महा ई-सेवा केंद्र करतेय लूट
By Admin | Updated: July 27, 2015 03:59 IST2015-07-27T03:59:04+5:302015-07-27T03:59:04+5:30
विविध शासकीय कामांसाठी प्रशासनाने आधार कार्ड सक्तीचे केल्यामुळे विद्यार्थी, पालक व नागरिक त्यासाठी धावपळ करीत आहेत. मात्र, कोणत्याच

महा ई-सेवा केंद्र करतेय लूट
आळंदी : विविध शासकीय कामांसाठी प्रशासनाने आधार कार्ड सक्तीचे केल्यामुळे विद्यार्थी, पालक व नागरिक त्यासाठी धावपळ करीत आहेत. मात्र, कोणत्याच शाळेत आधार यंत्रणा उपलब्ध नाही. उपलब्ध महा-ई-सेवा केंद्रावर विद्यार्थी, पालक व नागरिकांची गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेऊन महा-ई-सेवा केंद्राकडून कमीत कमी १०० ते ५०० रुपये उकळले जात आहेत.
आळंदी येथे नगरपालिकेच्या एकूण चार शाळा, श्रीमती लक्ष्मीबाई दुराफे व ज्ञानेश्वर विद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ९००० च्या आसपास आहे. या विद्यार्थ्यांना आधार कार्डचा नंबर शालेय प्रशासनाने मागितला असल्यामुळे विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही ‘आधार’साठी कामधंदा बुडवून खटाटोप करावी लागत आहे. नागरिकांनाही विविध शासकीय कामासाठी आधार कार्ड आवश्यक असल्यामुळे त्यांचीही गर्दी होत आहे.
शहरात उपलब्ध असलेल्या महा-ई-सेवा केंद्राकडे त्यामुळे गर्दी वाढली असून, विद्यार्थी, पालक व नागरिकांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे.
त्यामुळे या ‘आधार’ गोंधळात दिवसभराच्या कामाचा खोळंबा होत असल्याने पालक व नागरिक
त्रस्त असून, विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्येच ही तात्पुरती आधार यंत्रणा
कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याच होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत महा-ई-सेवा केंद्राने कमाईचा मार्ग शोधला असून, ‘आधार कार्ड’ नोंदणीसाठी कमीत कमी १०० व जास्तीत जास्त ५०० रुपये घेण्याचा प्रकार सुरू केला असल्याचे नागरिकांनी सांगितले. शाळेत वेळीच आधार यंत्रणा उपलब्ध करण्यात आली नाही व महा-ई-सेवा केंद्राकडून पैसे उकळणे बंद नाही झाल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा पालक व नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)