छाननीतच दिग्गज गारद!
By Admin | Updated: February 5, 2017 03:52 IST2017-02-05T03:52:48+5:302017-02-05T03:52:48+5:30
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्येच अर्ज बाद झाल्याने अनेक दिग्गज गारद झाले. कॉँग्रेस आणि शिवसेनेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

छाननीतच दिग्गज गारद!
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्येच अर्ज बाद झाल्याने अनेक दिग्गज गारद झाले. कॉँग्रेस आणि शिवसेनेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कॉँग्रेसचे अभिजित शिवरकर, रईस सुंडके यांचे अर्ज बाद झाले. शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना पक्षाचे चिन्ह मिळणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी ऐनवेळी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी खेचून आणली. मात्र, आॅनलाईन अर्ज भरताना राष्ट्रवादीचा उल्लेख असल्याने भाजपाची उमेदवारी रद्द झाली आहे. त्यांना अपक्ष म्हणून लढावे लागणार आहे.
प्रभाग क्रमांक ७मधून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यानंतर रेश्मा भोसले यांना ऐनवेळी भाजपाची उमेदवारी मिळाली होती. मात्र, भाजपाने सतीश बहिरट यांना एबी फॉम दिला होता. त्यामुळे दोघांनाही पक्षाची उमेदवारी मिळाली नाही.
पक्षांची गुप्तता उमेदवारांच्या मुळावर
सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना गुप्तता पाळली. शेवटच्या दिवसापर्यंत अधिकृत याद्या जाहीर केल्या नाहीत. इतर पक्षांतील बंडखोरांना उमेदवारी दिली. दोन जणांना एबी फॉर्म दिल्याचे प्रकार झाले. त्याचा फटका अनेक उमेदवारांना बसला.
छाननीचा शनिवारचा दिवस उमेदवारांची प्रतीक्षा पाहणारा ठरला. अर्जातील त्रुटी आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून घेतल्या जात असलेल्या हरकती यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती. काँग्रेसने उमेदवार यादी शेवटपर्यंत जाहीर केली नव्हती. त्याचा फटका पक्षाला बसला.
कॉँग्रेसच्या अनेक उमेदवारांना आता अपक्ष म्हणून लढावे लागणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव अभिजित शिवरकर यांनी अर्जावर सही केली नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. शिवरकर यांची महापौर प्रशांत जगताप यांच्याविरोधात मैत्रीपूर्ण लढत रंगणार होती.
कोंढव्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार रईस सुंडके यांचा अर्जही स्वच्छतागृह असल्याचा उल्लेख नसल्याने अर्ज बाद झाला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेविका सुनंदा देवकर सेनेकडून लढत होत्या. त्यांचाही अर्ज बाद झाला. माजी नगरसेवक विजय मोहिते यांचा प्रतिज्ञापत्राची दोन पाने न दिल्याने अर्ज बाद झाला.
सोमवार पेठ- कसबा पेठ मतदारसंघातून मनसेचे विद्यमान नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून अर्ज भरला होता. मात्र, या प्रभागातून दोन उमेदवारांना एबी फॉर्म असल्याने त्यांचा पक्षाचा अर्ज बाद ठरला. धंगेकर यांना अपक्ष म्हणून लढावे लागणार आहे. प्रभाग १६ मध्ये भाजपाच्या रिना आल्हाट, काँग्रेसच्या झुंबराबाई आरडे यांचेही पक्षाचे अर्ज बाद झाल्याने त्यांना अपक्ष लढावे लागणार आहे.
निवडणुकीसाठी आलेल्या २,६६६ अर्जांपैकी ३०९ अर्ज बाद झाले. त्यामुळे रिंगणात १४४१ उमेदवार राहिले आहेत.
प्रतिस्पर्ध्याला निवडणुकीआधीच गारद करण्याचे प्रयत्न अनेक उमेदवारांकडून करण्यात आला. बहुतेक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी सुरू राहिली. निवडणुकीसाठी आलेल्या २,६६६ अर्जांपैकी ३०९ अर्ज बाद झाले.
उमेदवारांची मोठी संख्या व दिग्गज उमेदवारांच्या अर्जांवर घेतल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या हरकती यामुळे उमेदवार अर्ज छाननीचे वेळापत्रक सर्वच क्षेत्रीय कार्यालयांत कोलमडून पडले. त्यातच काही अधिकाऱ्यांनी वाजवीपेक्षा जास्त काळजी घेत प्रत्येक मुद्द्यावर घोळ घातला.