क्रीडानिकेतनची रखडलेली बिले मंजूर
By Admin | Updated: January 7, 2015 00:40 IST2015-01-07T00:40:41+5:302015-01-07T00:40:41+5:30
महापालिकेच्या क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांच्या रिक्षाचालक व स्कूलबसचालकांची रखडलेली बिले महापालिका प्रशासनाकडून तातडीने मंजूर करण्यात आली आहेत.

क्रीडानिकेतनची रखडलेली बिले मंजूर
पुणे : महापालिकेच्या क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांच्या रिक्षाचालक व स्कूलबसचालकांची रखडलेली बिले महापालिका प्रशासनाकडून तातडीने मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोमवारपासून करावी लागणारी वणवण आता थांबणार आहे.
शिक्षण मंडळाकडून महापालिका प्रशासनाकडे अधिकारांचे हस्तांतर झाल्यानंतर, शाळांची बिले निघण्यास उशीर होत आहे. क्रीडानिकेतनच्या रिक्षा व व्हॅनचालकांची बिले गेल्या ८ महिन्यांपासून देण्यात आली नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडणे बंद केल्याच्या प्रकारास ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. या पार्श्वभूमीवर तातडीने बिले मंजूर करण्यात आली आहेत.
महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार करण्याच्या हेतून सुरू करण्यात आलेल्या विद्यानिकेतन शाळांच्या धर्तीवर ३ क्रीडानिकेतन शहरामध्ये सुरू करण्यात आल्या. दत्तवाडी येथे सर्वांत पहिली क्रीडानिकेतन २००९ मध्ये सुरू झाली, त्यानंतर आता हडपसर व येरवडा येथे क्रीडानिकेतनची सुरुवात झाली आहे. विविध खेळांचे विशेष प्रशिक्षण येथे विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याने, अनेक चांगले खेळाडू या शाळांमधून तयार होत आहेत. तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेची चाचणी घेऊन काही निवडक विद्यार्थ्यांना क्रीडानिकेतनमध्ये प्रवेश दिला जातो. सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत ही शाळा भरते. शहराच्या कानाकोपऱ्यांतून या शाळांमध्ये विद्यार्थी येतात, त्यात सकाळच्या व्यायाम व इतर प्रशिक्षणासाठी त्यांना लवकर यावे लागते. त्यामुळे महापालिकेकडून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी रिक्षा व व्हॅनची विशेष व्यवस्था केली आहे. बिले रखडण्याचा फटका या भावी खेळाडूंना बसत आहे. (प्रतिनिधी)
आज बिले मिळतील
क्रीडानिकेतनच्या विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या रिक्षाचालक व स्कूलबसचालकांची बिले मंजूर करण्यात आली आहेत. त्यांना बुधवारी ती दिली जातील, अशी माहिती शिक्षणमंडळाचे शिक्षणप्रमुख बी. एम. दहिफळे यांनी दिली. शिक्षणमंडळाकडून महापालिकेकडे अधिकारांचे हस्तांतर झाल्याने बिले मंजूर होण्यास उशीर होत आहे.