मंगेश पांडे, पिंपरीकायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील मोठे गुन्हेगार सुरक्षित असून, देखावा म्हणून छोट्या माशांवर तडीपारीची कारवाई केली जात आहे. मात्र, शहरात राजरोसपणे दहशत माजविणारे दादा, भाई, अण्णा, भाऊ यांसारखे मोठे मासे पोलिसांच्या गळाला कधी लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनीही ‘आता बास!’ म्हणत सर्वांना समान कायदा हे धोरण ठेवून बेधडक कारवाई केली, तरच खऱ्या अर्थाने शहरवासीय सुरक्षित जीवन जगू शकतील.पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस विविध उपाययोजना राबविल्याचा दावा करतात. प्रत्यक्षात गुन्हे वाढतच आहेत. पोलिसांकडे तडीपारीचे अस्त्र असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळेच गुन्हेगार पोलिसांना वरचढ झाल्याचे चित्र दिसते.खून, खुनाचा प्रयत्न, दंगा, टोळ्यांमधील सहभाग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेली, समाजासाठी घातक ठरू शकते, अशी व्यक्ती परिसरातून दूर राहिल्यास कायदा व सुव्यस्था अबाधित राहते. यासाठी गुन्हेगारांवर तडीपार कारवाईची तरतूद आहे. सध्या १३ जण तडीपार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र, या गुन्हेगारांपेक्षाही शहरासाठी अति धोकादायक असलेल्या ‘व्हॉइट कॉलर’ गुन्हेगारांकडे पोलीस डोळेझाक करीत आहेत. भोसरी, सांगवी, चिंचवड या भागात असे अनेक गुन्हेगार राजरोसपणे वावरत आहेत. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करणे दूरच, साधा गुन्हाही दाखल होत नाही. ‘व्हॉइट कॉलर’ गुन्हेगारांच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्याकडून संरक्षण दिले जाते. याच कार्यकर्त्यांचा निवडणुकीत वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा अनेकांचाप्रयत्न असतो. राजकीय दबावातून गुन्हेगारांना मिळत असलेले संरक्षण समाजातील वातावरण बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे. कारवाई केल्याची आकडेवारी दाखवीत कागदांचे रकाने भरावे लागतात. त्यासाठी देखावा म्हणून दोन महिन्यांतून एखादी कारवाई केली जाते. मात्र, पोलिसांनी हेच अस्त्र ‘व्हॉइट कॉलर’ गुन्हेगारांवर वापरल्यास शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे पोलिसांनाही शक्य होईल.
दादा, भाई, अण्णा, भाऊ गळाला कधी लागणार?
By admin | Updated: August 1, 2014 05:39 IST