एप्रिलपासून केवळ पॉस मशिनद्वारे धान्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:14 IST2018-03-28T02:14:12+5:302018-03-28T02:14:12+5:30
राज्यातील सर्व स्वस्त धान्यविक्री दुकानांमध्ये येत्या १ एप्रिलपासून आधार इनबिल्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन

एप्रिलपासून केवळ पॉस मशिनद्वारे धान्याचे वितरण
पुणे : राज्यातील सर्व स्वस्त धान्यविक्री दुकानांमध्ये येत्या १ एप्रिलपासून आधार इनबिल्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीमच्या (एईपीडीएस) माध्यमातून शिधावाटप केले जाणार आहे. यासाठी पुरवठा विभागाने सर्व दुकादारांना ई-पॉस मशिन उपलब्ध करून दिली असून, आता अंगठ्याचा ठसा घेऊनच धान्याचे वितरण केले जाईल. त्यामुळे स्वस्त धान्यविक्री दुकानांमध्ये कमी-अधिक प्रमाणात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा दावा प्रशासकीय अधिकाºयांकडून केला जात आहे.
शिधा घेताना प्रत्येक वेळी नागरिकाला ई-पॉस मशिनवर आपल्या अंगठ्याच्या ठस्याची (थम) जुळणी करूनच शिधा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना धान्यखरेदी करताना शिधापत्रिकेची (रेशनिंग कार्ड) गरज भासणार नाही. पुरवठा विभागाने राज्यातील सर्व स्वस्त धान्यविक्री दुकानांमध्ये ई-पॉस मशिन उपलब्ध करून दिली आहेत. या मशिनद्वारे सर्व नागरिकांच्या आधार कार्डाची माहिती आणि अंगठ्यांचे ठसे घेतले जात आहेत. पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे म्हणाल्या, ‘‘येत्या दोन ते तीन दिवसांत पुणे ग्रामीण भागातील सर्व नागरिकांची माहिती एईपीडीएस प्रणालीमध्ये संकलित होणार आहे. त्यामुळे पुणे ग्राणीम वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एईपीडीएस प्रणालीमध्ये नागरिकांच्या माहितीचे व अंगठ्यांच्या ठशांचे संकलन झाले आहे. येत्या १ एप्रिलपासून केवळ या प्रणालीद्वारेच धान्य वितरित केले जाईल. धान्यखरेदी केल्यानंतर प्रत्येक नागरिकाने दुकानदाराकडून धान्यखरेदीची पावती घ्यावी.