गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी
By Admin | Updated: August 18, 2014 05:19 IST2014-08-18T05:19:30+5:302014-08-18T05:19:30+5:30
उद्या सोमवारी सायंकाळी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी विविध मंडळे, प्रतिष्ठान व युवा नेते कामाला लागले आहेत.

गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी
उद्या सोमवारी सायंकाळी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी विविध मंडळे, प्रतिष्ठान व युवा नेते कामाला लागले आहेत. या कार्यक्रमाचे फ्लेक्स शहरात लागले आहेत. तसेच, टीव्ही चॅनेल, रेडिओ या माध्यमाबरोबरच व्हॉट्स अँप व फेसबुक यांसारख्या सोशल माध्यमातून त्याची मोठी जाहिरातबाजी केली जात आहे.
कार्यक्रमस्थळी भव्य व्यासपीठ, तसेच श्रीकृष्ण देखावा उभारून व परिसरात रोषणाई करून सजावट केली जात आहे. गोविंदा पथकावर पाणी फवारण्यासाठी पाण्याची व्यवस्था, तसेच दोन्ही बाजूंनी इमारतीला दोर बांधण्यापेक्षा क्रेनद्वारे हंडी उभारली जाते. त्यामुळे हंडी खाली-वर घेणे सोईस्कर ठरते. क्रेनला जोडलेल्या कॅमेर्याद्वारे चित्रिकरण व्यवस्था केली आहे. संगीताच्या तालावर तरुणाईला नाचण्यासाठी डीजे स्पीकरच्या भिंती चारही बाजूंनी उभारल्या जातात. संगीताबरोबरच रंगीबेरंगी प्रकाशयोजना परिसरात वेगळाच माहोल तयार करते. यात भर म्हणून काही नृत्यपथकांना आमंत्रित केले जाते. ते उपस्थितांचे मनोरंजन करतात. अद्ययावत तंत्राचा वापर करीत उत्सवास मेगा इव्हेंटचे रूप दिले जात आहे.
विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन अनेक इच्छुकांनी आपल्या सर्मथकांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मोठी देणगी देऊ केली आहे. अनेक मंडळांच्या देणगी पावत्या फाडत कार्यकर्त्यांना खूश करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा हंडीत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. कार्यकर्त्यांनी अनेक इच्छुकांना गाठत मोठी देणगी पदरात पाडून घेतली आहे.
राज्यभरातून पथके
हंडी फोडण्यासाठी राज्यभरातील पथकांना निमंत्रण दिले गेले आहे. यात मुंबई व दादर भागातील सर्वार्धिक पथकांचा समावेश आहेत. तसेच कोकण, रायगड, बारामती, चाकण, तळेगाव, पुणे भागांतील पथकांनाही बोलविण्यात आले आहे. सलामीसाठी विशेष मानधन पथकास दिले जाते.
नेतेमंडळींची उपस्थिती
उत्सवासाठी खासदार, आमदार, नगरसेवकांसह सर्वच पक्षांचे नेते व पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहतात. उद्योगपती, व्यावसायिक असा प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित केले जाते. पक्ष विसरून अनेक नेतेमंडळी या व्यासपीठावर एकत्रित आलेले पाहवयास मिळतात.
श्रीकृष्णापेक्षा तारकांनाच महत्त्व
श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाच्या दुसर्या दिवशी दहीहंडी फोडतात. दहीहंडीचे फ्लेक्स झळकले आहेत. एकाच चौकात विविध मंडळांच्या फ्लेक्सने गर्दी केली आहे. श्रीकृष्णांपेक्षा तारकांच्या फोटोने फ्लेक्स व्यापले आहेत. (प्रतिनिधी) पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील विविध मंडळे आणि युवा नेत्यांचा दहीहंडीचा उत्साह काही औरच आहे. तरुणाईला आकर्षित करण्याबरोबरच, स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला जात आहे. १ ते २५ लाखांपर्यंत बक्षिसांची खैरात केली आहे. गोविंदा लाखोंचे लोणी लुटणार आहेत. दहीहंडीचा इव्हेंट कॅश करण्यासाठी शहरभरात फ्लेक्सबाजी झळकल्याचे दिसून आले.