देहविक्री करणाऱ्यांच्या मदतीवर सरकारी अधिकारी सोनवणेचा सव्वा दोन कोटींचा डल्ला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST2021-05-14T04:10:57+5:302021-05-14T04:10:57+5:30
पुणे : धुणी-भांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणाऱ्या महिला दाखवून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांच्या निधीचा अपहार केला आहे. ...

देहविक्री करणाऱ्यांच्या मदतीवर सरकारी अधिकारी सोनवणेचा सव्वा दोन कोटींचा डल्ला?
पुणे : धुणी-भांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणाऱ्या महिला दाखवून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांच्या निधीचा अपहार केला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात सर्वाधिक ८ कोटी रुपयांचा निधी वाटप केल्याचा दावा केला होता.
कायाकल्प संस्थेच्या ३ महिलांसह ५ जणांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कायाकल्प संस्थेचे पदाधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास विभागातील अधिकारी प्रसाद सोनवणे यांनी प्रथम ६०० जणींची यादी तयार केली. त्यानंतर १६०० जणींची यादी तयार केली. अशा प्रकारे २ हजार २०० महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे वाटप केले. त्यांच्याकडून १० हजार रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायचे असल्याचे सांगून परत घेतले. अशा प्रकारे त्यांनी २ कोटी २० लाख रुपयांच्या निधीचा अपहार केला आहे.
कायाकल्पच्या तीन महिलांनी ही रक्कम गोळा केली. ती त्यांनी इतर दोघांकडे दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. महिला व बालविकास अधिकारी प्रसाद सोनवणे हा फरार झाला आहे. दत्तवाडी पोलिसांनी या पाचही जणांना आज न्यायालयात हजर केले. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी सांगितले की, मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध घ्यायचा आहे. अपहार केलेली रक्कम जप्त करायची असून बँक खाते गोठवायचे आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून विविध शासकीय कार्यालयांकडे तपास करण्यासाठी अटक आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यातील काही रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मिळाली असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय खोमणे अधिक तपास करीत आहेत.