लोणेरे विद्यापीठाकडे शासनाचे दुर्लक्षच
By Admin | Updated: November 2, 2015 01:07 IST2015-11-02T01:07:35+5:302015-11-02T01:07:35+5:30
तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले

लोणेरे विद्यापीठाकडे शासनाचे दुर्लक्षच
पुणे : तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले. परंतु, स्थापनेपासून शासनाचे विद्यापीठाकडे दुर्लक्ष झाले. तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाकडे केवळ एक लहान महाविद्यालय म्हणूनच पाहिले. परिणामी विद्यापीठात पायाभूत व शैक्षणिक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने विद्यापीठाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विद्यापीठाची स्थापना १९८९ मध्ये करण्यात आली. मात्र, त्यानंतर शासनाने या विद्यापीठाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली नाहीत. विद्यापीठात कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी या प्रमुख पदांसह शासनाने मंजूर केलेल्या पदांपैकी तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत. विद्यापीठासाठी सुमारे ५०० एकर जागा राखून ठेवण्यात आली आहे. मात्र, परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय, अत्याधुनिक रुणालये आदींचा विचार झालेला नाही. परिणामी या क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापक येथे येत नाहीत. परंतु, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच येथील १० विद्यार्थ्यांना शुक्रवारी पॉस्को कंपनीतर्फे तब्बल ५०० डॉलरची पाठ्यवृत्ती देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाचे अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या सर्व महाविद्यालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी जोडण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. मात्र, विद्यापीठाची एकूण स्थिती विचारात घेता सर्व महाविद्यालयांना विद्यापीठाशी संलग्न केल्यास राज्यातील तंत्रशिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय स्थगित ठेवला आहे. तंत्रशिक्षण विभागाकडे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती व पदोन्नतीचे प्रश्न प्रलंबित असून, अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होत नाही. येथील स्थानिक विद्यापीठाचा उल्लेख लोणेरे कॉलेज असाच करतात. एकूण अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी सर्वाधिक महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. या महाविद्यालयांना लोणेरे विद्यापीठाशी संलग्न करण्यास संस्थाचालकांचा विरोध आहे. मात्र, तंत्रशिक्षणात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व महाविद्यालये जोडण्याबाबत शासनाने सकारात्मक विचार सुरू केला आहे.