‘भारतरत्न’ पंडित भीमसेन जोशींच्या जन्मशताब्दीचा शासनाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:09+5:302021-02-05T05:20:09+5:30
पुणे : सुरांची दैवी देणगी लाभलेल्या आणि भारतीय अभिजात संगीताच्या सर्वोच्च शिखरावर अखंडपणे तळपत राहणाऱ्या ‘स्वरभास्करा’च्या जन्मशताब्दी वर्षास उद्यापासून ...

‘भारतरत्न’ पंडित भीमसेन जोशींच्या जन्मशताब्दीचा शासनाला विसर
पुणे : सुरांची दैवी देणगी लाभलेल्या आणि भारतीय अभिजात संगीताच्या सर्वोच्च शिखरावर अखंडपणे तळपत राहणाऱ्या ‘स्वरभास्करा’च्या जन्मशताब्दी वर्षास उद्यापासून (दि. ४) प्रारंभ होत आहे. ‘भारतीय शास्त्रीय संगीताचा मानदंड’, ‘भारतीय शास्त्रीय संगीताचा अध्वर्यू’ अशा अनेक बिरुदांबरोबरच ‘भारतरत्न’ ही उपाधी देखील पंडितजींच्या नावामागे जोडली गेली. ज्या शासनाने त्यांना हा सर्वोच्च किताब बहाल केला, त्या केंद्रच काय पण राज्य सरकारला देखील त्यांच्या जन्मशताब्दीचा विसर पडल्याने पंडितजींच्या शिष्यवर्गातून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी कर्नाटकमधील गदग येथे झाला. उद्या पंडितजींची ९९ वी जयंती असून, त्यांच्या जन्मशताब्दीस सुरुवात होत आहे. पंडितजींनी आयुष्यभर गानसेवेतून रसिकांना ब्रह्मानंद दिला. पुण्यात ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या अद्वितीय सुरांनी पंडित भीमसेन जोशी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अखंडपणे ‘गानयज्ञ’ सुरू ठेवला. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शासनातर्फे वर्षभर विविध कार्यक्रम केले जावेत किंवा एखादा पुरस्कार सुरू करावा अथवा एखादा विशेषांक तरी प्रसिद्ध करावा, अशी त्यांच्या शिष्यांची इच्छा आहे. तसेच, रसिकमनावर सुरांची मनसोक्त पखरण करणाऱ्या पंडितजींच्या कार्याची दखल घेऊन किमान तीन दिवस महोत्सव आयोजित केला जावा अशी रसिकांची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप तरी शासन स्तरावर कोणतीच घोषणा झालेली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
---
पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, कोरोनामुळे तूर्तास तरी मोठा कार्यक्रम घेणे शक्य नाही.
- विभीषण चावरे, संचालक, राज्य कार्य संचालनालय
---
शासनाने पंडितजींच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. त्याकरिता आम्ही काही मंत्र्यांच्याही भेटीगाठी घेतल्या. मात्र, पुढे काहीच घडलं नाही.
- पं. उपेंद्र भट, शिष्य पं. भीमसेन जोशी