‘ती’च्या मदतीसाठी शासनही सरसावले

By Admin | Updated: April 6, 2016 01:21 IST2016-04-06T01:21:22+5:302016-04-06T01:21:22+5:30

बांधकामावर मजुरीचे काम करीत असताना, विजेचा धक्का लागून झालेल्या अपघातात दोन्ही हात गमवावे लागले. दोन्ही हात नसल्याने जीवन असह्य होईल

The government also came to help him | ‘ती’च्या मदतीसाठी शासनही सरसावले

‘ती’च्या मदतीसाठी शासनही सरसावले

पिंपरी : बांधकामावर मजुरीचे काम करीत असताना, विजेचा धक्का लागून झालेल्या अपघातात दोन्ही हात गमवावे लागले. दोन्ही हात नसल्याने जीवन असह्य होईल, असे अपंगत्व आले असले, तरी धैर्य आणि जिद्दीने परिस्थितीशी सामना करणाऱ्या सुनीता पवार या महिलेविषयीचे विशेष वृत्त जागतिक महिलादिनी लोकमतने प्रसिद्ध केले. त्यानंतर या महिलेला समाजातून मदतीचा ओघ सुरू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जातीने यामध्ये लक्ष घातले. गंभीर दखल घेऊन राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या महिलेच्या भेटीसाठी धाडले. शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी, तसेच विविध योजनांचा लाभ तिच्या पदरात पडेल, या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करून घेण्यात आली आहे.
मूळची कर्नाटकची, शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले. आई-वडिलांचे छत्र बालपणीच हरपलेले. विवाहानंतर आठ वर्षांपूर्वी ती पतीबरोबर पोटाची खळगी भरण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाली होती. एका बांधकाम प्रकल्पावर बिगाऱ्याच्या हाताखाली ती मजूर म्हणून काम करायची. बांधकामावर पाणी मारताना, विजेच्या धक्का बसून घडलेल्या दुर्घटनेत तिचे दोन्ही हात निकामी झाले. अशातच तिची प्रसूती झाली. कन्यारत्न झाले. कोपराच्या पुढील हात नसल्याने स्वत:ची दैनंदिन कामे करणे अवघड झाले असताना, ती तिच्या चिमुकलीचाही सांभाळ करू लागली. ओढवलेल्या दुर्दैवी संकटाने डगमगून न जाता त्यावर धैर्याने मात करण्याची जिद्द बाळगून ती जीवन जगत असल्याचे वृत्त लोकमतने ८ मार्च २०१६ ला जागतिक महिलादिन विशेष म्हणून प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर समाजातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांनी तिला आर्थिक मदत देण्यासाठी धाव घेतली. संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन सुरू झाली. समाजातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला. त्यानंतर वृत्तवाहिन्यांनीसुद्धा या घटनेची नोंद घेतली.
लोकमतच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली. शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना महिलेची भेट घेण्यास पाठवले. एसटी, रेल्वे सवलतीपासून ते अपंगासाठीच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तिला मिळवून देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना पत्र दिले आहे. तिला घरकुल उपलब्ध करून द्यावे, असे महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)

 

Web Title: The government also came to help him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.