टेकड्यांचे होणार भूशास्त्रीय सर्वेक्षण

By Admin | Updated: March 10, 2015 04:58 IST2015-03-10T04:58:56+5:302015-03-10T04:58:56+5:30

माळीण’ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात लोकवस्ती निर्माण झालेल्या टेकड्यांचे भूशास्त्रीय (जिआॅलॉजिकल) सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Gothic geological survey will be done in the hills | टेकड्यांचे होणार भूशास्त्रीय सर्वेक्षण

टेकड्यांचे होणार भूशास्त्रीय सर्वेक्षण

सुनील राऊत, पुणे
‘माळीण’ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात लोकवस्ती निर्माण झालेल्या टेकड्यांचे भूशास्त्रीय (जिआॅलॉजिकल) सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पालिकेच्या २०१४-१६ च्या अंदाजपत्रकात तब्बल २ कोटी १२ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शहरातील ४२ टक्के झोपडपट्ट्यांमधील जवळपास २० टक्के झोपडपट्ट्या टेकड्याच्या परिसरात असल्याने भविष्यात माळीणसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

शहराच्या चारही बाजूंपैकी पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भागात अधिक टेकड्या आहेत. या टेकड्यांवर बीडीपीचे (बायो डायव्हर्सिटी पार्क) आरक्षण आहे. मात्र, त्यानंतरही या टेकड्या फोडून अनेक अनधिकृत बांधकामे झाले आहेत. तर, अनेक टेकड्यांवर झोपडपट्ट्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यात प्रामुख्याने वारजे परिसर, पर्वती, गोखलेनगरचा काही भाग, रामटेकडी, रामनगर, हनुमान टेकडी, केळेवाडी, येरवड्याचा काही भाग, बिबवेवाडी, कात्रज, तळजाई, तुकाईनगर, वडगावचा काही भाग, तसेच आंबेगाव आणि जांभूळवाडीचा काही भाग या प्रमुख टेकड्यांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठी लोकवस्ती झाली आहे. त्यामुळे या ठिकाणीही पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता आहे.
जुलै २०१४ मध्ये माळीण येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण गावच दरडीखाली गाडले गेले होते. त्यात १३६ जणांचा मृत्यू झाला होता. मोठा पाऊस अथवा भूकंप झाल्यास पुण्यातील टेकड्यांच्या परिसरातही अशी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातही या धोक्याबाबत शक्यता व्यक्त करण्यात आल्याने भविष्यातील खबरदारीचा उपाय म्हणून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Gothic geological survey will be done in the hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.