‘मोक्का’तून जामिनासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविणारा गुंड नीलेश बसवंत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:49+5:302021-04-01T04:12:49+5:30
पुणे : ‘मोक्का’तील गुन्ह्यात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून जामीन मिळविलेल्या बापू नायर टोळीतील गुंड नीलेश बसवंत याला गुन्हे शाखेच्या ...

‘मोक्का’तून जामिनासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविणारा गुंड नीलेश बसवंत जेरबंद
पुणे : ‘मोक्का’तील गुन्ह्यात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून जामीन मिळविलेल्या बापू नायर टोळीतील गुंड नीलेश बसवंत याला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने खेड शिवापूर येथून अटक केली. बसवंत याच्यावर खंडणी, मारामारी, खून असे १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोन वेळा मोक्का कारवाई केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कोंढवा पोलिसांनी बापू नायर टोळीला मोक्का लावला होता. त्यामध्ये नीलेश बसवंत, अमोल बसवंत, दीपक कदम, दत्ता माने यांच्यावर गुन्हा दाखल होता. निलेश बसवंत याला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. त्याने आजारपणाचे कारण सांगून तशी कागदपत्रे उच्च न्यायालयात सादर केली होती. त्यामध्ये सातारा येथील डॉ. अंदुरे यांचे ऑनेको लाईफ कॅन्सर सेंटरच्या नावाने प्रमाणपत्र सादर केले होते. याबाबत शंका आल्याने पुणे पोलिसांनी चौकशी केली. त्यात डॉ. अंदुरे यांनी असे प्रमाणपत्र आपण दिले नसल्याचे व ते बनावट असल्याचे सांगितले. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जामीन मिळाल्यावर तो फरार झाला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, निलेश बसवंत हा खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळ कुटंबियांना भेटण्यासाठी येणार आहे. योगेश जगताप यांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुकत श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली़ उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी व त्यांच्या पथकाने सापळा रचून नीलेश बसवंत याला पकडले.