पुणे : राज्यात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता जास्त असल्यानेच बहुतांश योजनांच्या अंमलबजावणीसाठी महसूल विभागाला नेमले जाते. याचाच अर्थ महसूल विभागावर राज्य सरकारचा विश्वास जास्त आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा. तुमचे काम आणि उद्देश चांगले असल्यास तुम्हाला अडचण येणार नाही. पारदर्शकपणे काम करा. तुमचा सत्कार करू. मात्र, चुकीचे काम केल्यास जरूर कारवाई करणार, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आयोजित महसूल कार्यशाळेत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, भूमी अभिलेख विभागाच्या राज्य संचालक सरिता नरके, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, डॉ. कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे उपस्थित होते.डुडी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांमध्ये संवाद वाढावा यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. कामकाजात सुधारणा करण्यासाठी असा संवाद करणे गरजेचे असते. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांत प्रलंबितता दिसून येत आहे. त्यासाठी नेहमीची कारणे देऊन चालणार नाही. पारदर्शकपणे काम केल्यास ही कामे जलद गतीने मार्गी लागतील. त्यासाठी कोणाचाही दबाव स्वीकारू नका. ब्लॅकमेल करणाऱ्यांना बळी पडू नका. तुम्हा पारदर्शक असल्यास काळजी करून नका, मात्र, प्रलंबितता ठेवून चालणार नाही. नेहमीची कार्यपद्धती यापुढे चालणार नाही. वेगाने काम करून चांगला परिणाम दाखवा.यापुढील काळात सर्वच विभागाचा जिल्हास्तरावरून आढावा घेण्यात येईल. त्यात २०० ते २५० गुणांची साचा ठरवून जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट तलाठी, मंडलाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार ठरविण्यात येईल. त्यांना पुरस्कृतही केले जाईल. मात्र, जे काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई अटळ आहे.मोजणी अर्जांवर तातडीने कार्यवाही करावीराज्यात ॲग्रिस्टॅक योजनेत तीन प्रमुख भागांत माहिती गोळा केली जात आहे. त्यासाठी तलाठ्यांनी वेगाने आणि योग्य पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे मत नरके यांनी यावेळी व्यक्त केले. राज्य सरकारकडून कृषी विभागामार्फत दिले जाणारे लाभ याच योजनेच्या माहितीवरून दिला जाणार असल्याने यात अधिक पारदर्शकता असावी. भूमी अभिलेख विभागाने जिल्हा प्रशासनासोबत काम करून मोजणी अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सुचविले.महसूल कार्यशाळा अन्य जिल्ह्यांतहीपुण्यात राबविण्यात आलेला महसूल कार्यशाळेचा उपक्रम विभागाच्या अन्य जिल्ह्यांतही राबविण्यात येईल, अशी घोषणा विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी केली. कर्मचाऱ्यांच्या कारभारात पारदर्शकता असावी. चोखपणा असल्यास कारभार स्वच्छ राहतो. कर्मचाऱ्यांनी नागरिकांसाठी कायम उपलब्ध असावे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुकास्तरावर सर्व विभागांनी महिन्यातून एकदा बैठक घेऊन समन्वय ठेवावा. सामाईक सुविधा केंद्र आणि सेतू केंद्रांविषयी अनेक तक्रारी आहेत. त्या येऊ नयेत ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण तयार करण्यासाठी चुकीचे आदेश होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
चांगले काम केल्यास सत्कार, चुकल्यास कारवाई अटळ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:14 IST