जुन्नरवासीयांना ‘गुड न्यूज’; यंदा कोणतीही करवाढ नाही!
By Admin | Updated: February 24, 2015 23:03 IST2015-02-24T23:03:19+5:302015-02-24T23:03:19+5:30
जुन्नरकरांसाठी एक गूड न्यूज आहे. आज सादर केलेल्या शिलकी अंदाजपत्रकात कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही.

जुन्नरवासीयांना ‘गुड न्यूज’; यंदा कोणतीही करवाढ नाही!
जुन्नर : जुन्नरकरांसाठी एक गूड न्यूज आहे. आज सादर केलेल्या शिलकी अंदाजपत्रकात कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. नगर परिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत सन २०१५-१६ या वित्तीय वर्षाचे हे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर करण्यात आल्याचे नगराध्यक्षा राणी शेळकंदे यांनी सांगितले.
कोणतीही घरभाडे, पाणीपट्टी व इतर करांत वाढ झाली नाही. या अर्थसंंकल्पात ३३ कोटी ७० लाख रुपये जमा आणि २३ कोटी ८० लाख रुपये खर्चासह वर्षअखेरीस १० कोटी १० लाख रुपये शिल्लक दाखवण्यात आली आहे. यात प्राथमिक सोई-सुविधा अनुदानातून १ कोटी ५० लाख रुपये, वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून १ कोटी रुपये, रमाई आवास घरकुल योजनेतून ९० लाखांचा निधीचा समावेश करण्यात आला आहे.
या वेळी घनकचरा प्रकल्प, मौलाना अबुल कलाम आझाद, सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा करणे, राज वल्लभ जलतरण तलाव यासाठी भरीव तरतूद करावी, अशी सूचना नगरसेवक विकास खोपे यांनी केली. त्यास नगरसेविका जयश्री बावबंदे यांनी अनुमोदन दिल्यानंतर शिलकी अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले.
या वेळी मुख्याधिकारी संतोष वारुळे, उपनगराध्यक्षा माधुरी जोगळेकर, माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे, अनिल मेहेर, नगरसेवक विकास खोपे, शिवसेना गटनेते मधुकर काजळे, जमीर कागदी, फिरोज पठाण, माजी नगराध्यक्षा किशोरी होगे, भारती मेहेर, सुजित परदेशी, अविनाश कर्डिले, अविन फुलपगार, शाम पांडे, बावबंदे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
हा अर्थसंकल्प जुन्नरवासीयांना दिलासा देणारा असला तरी कोट्यवधी रुपयांच्या अर्थसंकल्पाची बैठक अवघ्या तीन मिनिटांत उरकून सत्ताधारी राष्ट्रवादीने जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला.
चर्चा करण्यात आली असती तर शहराच्या उत्पन्नात भर घालणारे अनेक निर्णय घेता आले असते, असे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शाम पांडे यांनी सांगितले. (वार्ताहर)