करंजेपुल येथे सोन्याचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST2021-09-11T04:13:37+5:302021-09-11T04:13:37+5:30
सोमेश्वरनगर : करंजेपुल (ता. बारामती) येथील गायकवाड संकुल मधील श्रीपाद ज्वेलर्स हे सोन्याचांदीचे दुकान शुक्रवारी रोजी मध्यरात्री फोडले. मात्र, ...

करंजेपुल येथे सोन्याचे दुकान फोडले
सोमेश्वरनगर : करंजेपुल (ता. बारामती) येथील गायकवाड संकुल मधील श्रीपाद ज्वेलर्स हे सोन्याचांदीचे दुकान शुक्रवारी रोजी मध्यरात्री फोडले. मात्र, स्थानिक वृत्तपत्र विक्रेते गंगाराम कामठे आणि गणपती विक्रीसाठी आलेले व्यावसायिक यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना पलायन करावे लागले. यात लाखो रुपयांचे सोने वाचले. मात्र, चोरट्यांनी ७१ हजार ५०० रुपयांच्या चांदीवर डल्ला मारला. करंजेपुल येथे असणारे श्रीपाद ज्वेलर्सची पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. गॅस कटरच्या साह्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तिजोरी फोडता आली नाही. करंजेपुल येथील पेपर विक्रेते यांना संशय आल्याने चौकातील गणपती विक्रेत्यांना बरोबर घेऊन ते शहाणे ज्वेलर्स जवळ गेले असता चोरट्यांनी पलायन केले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. याबाबत संग्राम दिलीप शहाणे (रा. टी.सी. कॉलेज जवळ बारामती) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेत दुकानातील चांदीच्या गणेशमूर्ती, लक्ष्मीमूर्ती, पैंजण, छल्ले, चांदी वाटी, चमचे, करंडे, मासुळ्या आदी सुमारे ७१ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत.
चौकट
श्रीपाल ज्वेलर्सची मागील भिंत फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. गोंधळ झाल्यानंतर चोरट्यांनी त्याच ठिकाणी गॅस, गॅसकटर इतर साहित्य त्याच ठिकाणी टाकून पळ काढला आहे. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे कैद झाले आहे. पोलिसांनी आसपासचे सर्व सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरटे लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील असे सोमनाथ लांडे यांनी सांगितले.