महाराष्ट्रात आढळले सोन्याचे कण
By Admin | Updated: March 5, 2015 00:34 IST2015-03-05T00:34:41+5:302015-03-05T00:34:41+5:30
महाराष्ट्रात नंदुरबार येथील प्रसिद्ध शनिमंदिराजवळ सोन्याचे कण आणि प्लॅटिनम असल्याचे संकेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) दिले आहेत.

महाराष्ट्रात आढळले सोन्याचे कण
पुणे : महाराष्ट्रात नंदुरबार येथील प्रसिद्ध शनिमंदिराजवळ सोन्याचे कण आणि प्लॅटिनम असल्याचे संकेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात संशोधन केले जात आहे, असे जीएसआय मध्य विभागाचे प्रमुख असीम कुमार साहा यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जीएसआयच्या १६५व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील जीएसआयच्या कार्यालयात रॉक गार्डन संग्रहालयाचे उद्घाटन साहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सहा पत्रकारांशी बोलत होते. या वेळी पुणे विभागाचे प्रमुख एम. एम. पवार उपस्थित होते.
नागपूरपासून ७० किमी. अंतरावर असलेल्या परसोळी येथे सोने, तांबे आणि प्लॅटिनमचे कण असलेल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, अद्याप येथे कामास सुरुवात झालेली नाही, असे स्पष्ट करून सहा म्हणाले, की नंदुरबार परिसरातसुद्धा सोने व प्लॅटिनम असल्याचे संकेत मिळाले असून, जीएसआयतर्फे दोन वर्षांपासून त्यावर काम केले जात आहे. परंतु, हे संशोधन सध्या प्राथमिक पातळीवर असून, येथे किती साठा असण्याची शक्यता आहे, याबाबतचा तपशील सखोल संशोधनानंतर पुढे येणार आहे. (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प सूरू करण्यापूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे,असे महाराष्ट्र शासनाच्या गॅझेट मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे या पुढील काळात भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यापूर्वी जीएसआयची परवानगी घ्यावी लागणार आहे.
- असीम कुमार साहा,
जीएसआय, प्रमुख, मध्य विभाग
पावसामुळे माळीण दुर्घटना
४माळीण दुर्घटनेच्या प्रस्तावाबाबत माहिती देताना साहा म्हणाले, की डोंगराला असणारा उतार, मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस यामुळेच ही दुर्घटना घडली असल्याचा अहवाल जीएसआयने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला असून, त्यांनी तो स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या काही संवेदनशील स्थळाची पाहणी आम्ही केली असून, त्यातील धोक्याच्या ठिकाणांची माहिती जीएसआयने संबंधित विभागाला कळविली आहे.