पुणे : युवा गायक द्वयी कृष्णा बोंगाणे व नागेश आडगावकर यांचे तयारीचे गायन आणि गायिका संगीता कट्टी यांनी रंगवलेला यमन यामुळे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना आगळावेगळा श्रवणानंद मिळाला. थंडीच्या कडाक्यातदेखील रसिकांनी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद दिला.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गायक कृष्णा बोंगाणे आणि नागेश आडगावकर यांच्या तयारीच्या गायनाने झाली. त्यांनी राग मुलतानीमध्ये विलंबित एकतालात ‘‘गोकुल गाव का छोरा रे...’’ ही पारंपरिक रचना सुव्यवस्थित पद्धतीने मांडली. आलापीतून रागरूप उभे करताना या दोन्ही गायकांनी एकमेकांना दाद देत, पूरक स्वराकृती मांडल्या. सरगमचाही उत्तम वापर त्यांनी केला. ‘‘कंगन मुंदरिया मोरी रे...’’ ही द्रुत त्रितालातील रचनाही त्यांनी सादर केली. त्यानंतर मिश्र भिन्न षड्ज रागात ‘‘याद पिया की आये...’’ ही प्रसिद्ध ठुमरी त्यांनी केरवा तालात भावपूर्णतेने गायिली. ‘‘मी गातो नाचतो आनंदे...’’ ही मालकंस रागावर आधारित भक्तिरचना सादर करत त्यांनी विराम घेतला. या दोघांना मयंक बेडेकर (तबला), निरंजन लेले (हार्मोनियम), ओंकार दळवी (पखवाज), विश्वास कळमकर (टाळ) आणि वैभव कडू व प्रफुल्ल सोनकांबळे यांनी तानपुरा साथ केली.
त्यानंतर कर्नाटक आणि उत्तर हिंदुस्थानी संगीतावर प्रभुत्व असणाऱ्या प्रसिद्ध गायिका संगीता कट्टी कुलकर्णी यांचे स्वरमंचावर आगमन झाले. बहुविध सांगीतिक प्रतिभा असणाऱ्या संगीता कट्टी यांनी राग यमनमध्ये ‘‘मो मन लगन लागी...’’ ही गाजलेली बंदिश सादर केली. ‘‘सखी एरी आली पियाबिन...’’ ‘‘पिया की नजरिया...’’ या त्यांनी गायलेल्या प्रसिद्ध बंदिशींना रसिकांनी दाद दिली. पुरंदरदास यांची रचना सादर करून संगीता कट्टी यांनी गायनाची सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), माऊली टाकळकर (टाळ) तर अनुजा क्षीरसागर व सोनम कंद भाडळे यांनी तानपुरा साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी एका प्रेक्षकाच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी ठाण्याचे शुभानन आजगावकर यांच्या हस्ते गायिका संगीता कट्टी व सहकलाकारांचा सत्कार करण्यात आला.