नाट्यगृहाचे पार्किंग बनले गोडाऊन
By Admin | Updated: July 6, 2015 05:23 IST2015-07-06T05:23:16+5:302015-07-06T05:23:16+5:30
घोले रस्त्यावरील पंडित नेहरू सांस्कृतिक भवनाच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज सर्व सेवासुविधांयुक्त इमारत उभी राहिली.

नाट्यगृहाचे पार्किंग बनले गोडाऊन
दीपक जाधव, पुणे
घोले रस्त्यावरील पंडित नेहरू सांस्कृतिक भवनाच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज सर्व सेवासुविधांयुक्त इमारत उभी राहिली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इमारतीच्या पार्किंगमध्ये अतिक्रमण कारवाईचे साहित्य ठेवण्यात येत आहे. त्यामुळे सांस्कृतिक भवनाच्या इमारतीला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे गर्दी होत असल्याने आणखी एका सांस्कृतिक भवनाची मागणी होती. त्यामुळे महापालिकेने घोले रस्त्यावरील पंडित नेहरू सांस्कृतिक भवनाची उभारणी २००३ मध्ये केली. त्यानंतर २०१४ मध्ये त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून त्याचे नूतनीकरण करण्यात आले. तीन मजली इमारतीमध्ये प्रशस्त नाट्यगृह, देखणे कलादालन, ग्रंथालय, प्रशिक्षण प्रबोधिनी आदींची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी एकाच वेळी ४ वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू राहत असल्याने मोठ्या संख्येने दररोज नागरिक या ठिकाणी येतात. त्यामुळे इमारतीच्या समोरील मोकळ्या बाजूस व तळमजल्यावर पार्किंगची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. तळमजल्यावर चारचाकी वाहनांसाठी, तर समोरील बाजूस दुचाकींची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वी शहरामध्ये धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अनेक हातगाड्या, स्टॉल, पथारीधारकांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले. हे साहित्य ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने नेहरू सांस्कृतिक भवनातील चारचाकी पार्र्किंगच्या जागेत हे सर्व साहित्य ठेवण्यात आले आहे. शेकडो हातगाड्या, स्टॉल यांनी संपूर्ण पार्किंग भरून गेले आहे.
-----------
एका महिन्यात पार्किंग खाली करू
जागेची अडचण असल्याने तात्पुरत्या स्वरूपात नेहरू सांस्कृतिक भवनाच्या जागेत साहित्य ठेवले आहे. कारवाईत जप्त केलेल्या हातगाडीचालक व पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करून त्यांचे साहित्य सोडले जात आहे. त्याचबरोबर गेल्या ५ ते ६ वर्षांपासून जप्त केलेले साहित्य दंड भरून परत न नेले असल्यास लिलाव प्रक्रिया राबवून त्याची विक्री केली जाणार आहे. साधारणत: महिनाभरात ही जागा मोकळी केली जाईल. - माधव जगताप, प्रमुख अतिक्रमण निर्मूलन विभाग