डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडणार
By Admin | Updated: April 9, 2016 01:51 IST2016-04-09T01:51:31+5:302016-04-09T01:51:31+5:30
डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, या नागरिकांच्या मागणीला यश आले असून, १५ एप्रिलपासून डिंभे धरणातून कालव्याला पाणी सोडण्याच्या सूचना पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत

डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडणार
घोडेगाव : डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, या नागरिकांच्या मागणीला यश आले असून, १५ एप्रिलपासून डिंभे धरणातून कालव्याला पाणी सोडण्याच्या सूचना पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यामुळे या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
डिंभे धरण उजव्या कालव्याला पाणी सोडावे, यासाठी शिवसेनेने दि.१० एप्रिल रोजी धरणावर जाऊन डाव्या कालव्याचे पाणी बंद करणार असल्याचा इशारा दिला होता. दरम्यान, कालव्याला पाणी यावे, यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्याशी चर्चा केली होती. तसेच, त्यांनी कार्यकारी अभियंता यांना दि.१५ एप्रिलपर्यंत पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखिले यांनी सांगितले. सध्या डाव्या कालव्याद्वारे दि.१५ मार्चपासून येडगाव धरणातून नगर जिल्ह्याला पाणीपुरवठा सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात धरण आहे, येथे पडणाऱ्या पावसावर धरण भरते व तालुक्यातील लोकांनी धरणासाठी जमिनी दिल्या; मात्र स्थानिक लोकच तहानलेले आहेत.
आंबेगावच्या पूर्व भागातील व शिरूर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नदी व कालव्यावर अवलंबून असलेल्या पाणी योजना अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे उजव्या कालव्याला तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी करत कुकडी पाटबंधारे विभागाने दि.१० एप्रिलपर्यंत उजव्या कालव्याला पाणी न सोडल्यास आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकरी धरणावर जाऊन डाव्या कालव्याला सुरू असलेले पाणी बंद करतील, असा इशारा शिवसेना नेते अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखिले व तालुकाप्रमुख सुनील बाणखेले यांनी दिला होता.
या संदर्भात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विजय शिवतरे यांच्याशी चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी केली. तशा सूचनाही शिवतरे यांनी कार्यकारी अभियंता यांना दिल्या असून, शिवसेनेच्या दणक्यामुळे दि.१५ एप्रिलपर्यंत पाणी येणार असल्याचे रवींद्र करंजखिले यांनी सांगितले आहे.