अलंकापुरीत ‘श्रीं’ची वैभवी मिरवणूक
By Admin | Updated: December 9, 2015 00:24 IST2015-12-09T00:24:18+5:302015-12-09T00:24:18+5:30
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त मंगळवारी (दि. ८) अलंकापुरीत ‘श्रीं’ची वैभवी रथोत्सव मिरवणूक ‘माऊली-माऊली’च्या जयघोषात उत्साहात पार पडली.

अलंकापुरीत ‘श्रीं’ची वैभवी मिरवणूक
शेलपिंपळगाव : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त मंगळवारी (दि. ८) अलंकापुरीत ‘श्रीं’ची वैभवी रथोत्सव मिरवणूक ‘माऊली-माऊली’च्या जयघोषात उत्साहात पार पडली. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या असंख्य भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी नगरप्रदक्षिणा मार्गावर सलग चौथ्या दिवशीही मोठी गर्दी केली होती. बुधवारी माऊलींच्या संजीवन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
मंगळवारी पहाटे माऊलींना पवमान, अभिषेक घालून व दूधआरती करून तीनच्या सुमारास प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे यांच्या हस्ते पंचोपचार शासकीय पूजा करण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार प्रशांत आवटे, मंडल अधिकारी शरद कारकर उपस्थित होते. त्यानंतर सकाळी साडेअकरापर्यंत भाविकांच्या महापूजा व दर्शन कार्यक्रम झाला. दुपारी माऊलींना महानैवेद्य देण्यात आला.
सायंकाळी चारच्या सुमारास ‘श्रीं’ची पालखी हरिनामाच्या गजरात मंदिराच्या महाद्वारातून नगरप्रदक्षिणेसाठी निघाली. शनिमंदिरमार्गे गोपाळपुऱ्यातील इनामदारांच्या श्रीकृष्ण मंदिरात ती आली. परंपरेनुसार इनामदार कुटुंबीयांच्या वतीने माऊलींची विधिवत पूजा करून माऊलींचा चांदीचा मुखवटा नगरप्रदक्षिणेसाठी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आला. विविध रंगीबेरंगी आकर्षक वस्त्रालंकारांनी सजविलेले ‘श्रीं’चे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.
वीणा, टाळ-मृदंगाचा निनाद आणि वारकऱ्यांच्या जयघोषात हा वैभवी रथोत्सव मिरवणूक सोहळा फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे हजेरी मारुतीपासून मंदिराकडे मार्गस्थ झाला. रात्री साडेआठच्या सुमारास पालखी मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर मंदिरातील गाभाऱ्यात फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख, सेवेकरी यांचा देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘श्रीं’चा मुख्य गाभारा भाविकांच्या महापूजा, तसेच दर्शनासाठी खुला करण्यात आला. महानैवेद्य, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन, जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी द्वादशीचा दिवस साजरा करण्यात आला. (वार्ताहर)