‘नो कॅश’चे झळकले फलक
By Admin | Updated: November 14, 2016 06:54 IST2016-11-14T06:54:27+5:302016-11-14T06:54:27+5:30
शहरातील बहुतांश एटीएम सेंटर्समध्ये पैशांचा खडखडाट असल्याने पुणेकरांचा रविवार कोणत्या एटीएम सेंटरमध्ये पैसे मिळतात, हे

‘नो कॅश’चे झळकले फलक
पुणे : शहरातील बहुतांश एटीएम सेंटर्समध्ये पैशांचा खडखडाट असल्याने पुणेकरांचा रविवार कोणत्या एटीएम सेंटरमध्ये पैसे मिळतात, हे शोधण्यातच गेला. अनेक ठिकाणी फिरून हे नागरिक हैराण झालेले दिसत होते. बँकांच्या हेल्पलाइनवर प्रतिसाद येत नसल्याने या हैराणीत अधिकच वाढ झाली.
एटीएमसमोर नेहमीप्रमाणे सुरक्षारक्षक नसल्याचे चित्र होते. अनेकदा पैशांसाठी आत गेलेल्या नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बूज राखत स्वत:वर संयम ठेवला.
कसबा पेठेतील नवग्रह मंदिराजवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये शनिवारी दुपारी ४ वाजता करण्यात आलेला नोटांचा भरणा तीन तासांतच संपला. ‘नो कॅश’ अशी सूचना लिहिलेली असूनही रविवारी सकाळपासून अनेकदा ग्राहकांनी पैसे मिळतात की नाही, याची चाचपणी केली. आनंदनगरमधील सनसिटी स्टॉपजवळील स्टेट बँकेच्या केंद्रात रात्री पैसे भरल्याचे समजल्यावर स्थानिक नागरिकांनी पैसे घेण्यासाठी रांग लावली; मात्र पैसेच बाहेर येत नव्हते. बँकेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतरही थंड प्रतिसादामुळे नागरिकांचा संताप झाला.
बाजीराव रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या इमारतीमधील केंद्रात अनेक एटीएम मशिन्स असल्याने नागरिकांनी आशेने अनेकदा आत जाऊन चाचपणी केली; मात्र दुपारी अडीचपर्यंत सर्व केंद्रे बंदच होती.
प्रभात रस्त्यावरील आयसीआयसीआय, अप्पा बळवंत चौकातील एचडीएफसी या बँकांची केंद्रे बंदच होती. कॅम्प भागातील पंजाब नॅशनल बँकेचे केंद्र व भांडारकर रस्त्यावरील फेडरल बँकेचे केंद्र यासमोर मोठ्या रांगा होत्या.
बँकांच्या शाखा खुल्या असल्याने अनेकांनी तो पर्याय अवलंबला. धायरीतील स्टेट बँकेच्या शाखेत सकाळपासून गर्दी होती. रमणबाग शाळेजवळील एचडीएफसी बँकेबाहेर असलेल्या रांगेचे व्यवस्थापन केले जात असल्याने पंधरा ते वीस मिनिटे रांगेत थांबून सुटे पैसे मिळालेल्या नागरिकांमध्ये समाधान होते.