रिंगरोड ‘पीएमआरडीए’कडे द्या
By Admin | Updated: August 24, 2015 03:08 IST2015-08-24T03:08:35+5:302015-08-24T03:08:35+5:30
गेल्या २८ वर्षांपासून शहरात अंतर्गत रिंग रोड (एचसीएमटीआर) प्रस्तावित आहे. मात्र, अद्याप महापालिकेला भूसंपादन करण्यात यश आलेले नाही.

रिंगरोड ‘पीएमआरडीए’कडे द्या
पुणे : गेल्या २८ वर्षांपासून शहरात अंतर्गत रिंग रोड (एचसीएमटीआर) प्रस्तावित आहे. मात्र, अद्याप महापालिकेला भूसंपादन करण्यात यश आलेले नाही. तसेच, अधिका-यांची भूसंपादनासाठी उदासिनता दिसते. त्यामुळे हा प्रकल्प पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे देण्यात यावा, असे पत्र उपमहापौर आबा बागुल यांनी दिले आहे.
महापालिकेच्या १९८७ च्या प्रारुप विकास आराखड्यात सुमारे ३४ किलोमीटरचा अंतर्गत रस्ते जोडणारा एचसीएमटीआरचा प्रकल्प प्रस्तावित केला. त्यामुळे मध्यवर्ती शहरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. मात्र, एचसीएमटीआर प्रकल्पासाठी भूसंपादनाचा अडथळा आला आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करता येणार नसल्याचे जिल्हाधिका-यांनी कळविल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
मात्र, त्याविषयी मुख्य सचिव नितीन करीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरून महापालिका प्रशासनाची या प्रकल्पाच्या भूसंपादनाविषयीची उदासिनता दिसून येते.
दरम्यान, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी हा प्रकल्प २८ महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, महापालिकेतून या प्रस्तावाला विरोध करण्यात आला.
प्रत्यक्षात महापालिकेकडून २८ वर्षांत प्रकल्पाचे भूसंपादन झालेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी भूसंपादनासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा पीएमआरडीएकडे प्रकल्प देण्यात यावा, अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.
(प्रतिनिधी)