घरबसल्या पालिकेला द्या प्लॅस्टिक कचरा
By Admin | Updated: February 14, 2016 03:25 IST2016-02-14T03:25:35+5:302016-02-14T03:25:35+5:30
शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यामध्ये दरदिवशी सुमारे १०० ते १५० टन प्लॅस्टिक कचऱ्याची निर्मिती होत आहे. या कचऱ्यामुळे प्रक्रिया प्रकल्पांमध्ये अडचणी निर्माण होण्याबरोबरच त्यांचे

घरबसल्या पालिकेला द्या प्लॅस्टिक कचरा
पुणे : शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यामध्ये दरदिवशी सुमारे १०० ते १५० टन प्लॅस्टिक कचऱ्याची निर्मिती होत आहे. या कचऱ्यामुळे प्रक्रिया प्रकल्पांमध्ये अडचणी निर्माण होण्याबरोबरच त्यांचे विघटन होत नसल्याने तो पर्यावरणासही घातक ठरत आहे. त्यामुळे शहर प्लॅस्टिक कचरामुक्त करण्यासाठी महापालिका आता थेट तुमच्या घरी येऊन प्लॅस्टिक कचरा घेऊन जाणार आहे. त्यासाठीचा टोल फ्री क्रमांक महापालिकेकडून सुरू करण्यात आला असून या कामासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्लॅस्टिक कचरामुक्तीसाठी महापालिकेने एक पाऊल उचलल्यानंतर आता पुणेकरांनीही त्यास प्रतिसाद दिल्यास कचऱ्याबरोबर येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालणे सहज शक्य होणार आहे.
पुणे शहरात शनिवारपासून प्लॅस्टिक कचरामुक्त शहर अभियान सुरू करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत प्लॅस्टिक कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात महापालिकेकडून नागरिकांनी घरात साठविलेला कचरा त्यांच्या घरी जाऊन संकलित करण्यात येणार आहे.
अशी असेल यंत्रणा
या यंत्रणेनुसार, महापालिकेने संपूृर्ण शहरासाठी 18002333232 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. या क्रमांकावर (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) फोन करून नागरिकांनी आपल्याकडे घरात जमा केलेल्या प्लॅस्टिकची माहिती महापालिकेस द्यावयाची आहे. ती माहिती दिल्यानंतर या माहितीवरून नागरिकांनी दिलेल्या पत्त्यानुसार, ती संबंधित क्षेत्रीय कार्यालयास देण्यात येईल. त्यानंतर कचरावेचक नागरिकांच्या घरी प्लॅस्टिक कचरा आणण्यासाठी जातील. नागरिकांना हा कचरा स्वत: आणून द्यायचा असल्यास त्यांना आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आरोग्य कोठीमध्ये प्रत्येक गुरुवारी हा कचरा आणून देता येईल. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्लॅस्टिकच का ?
शहरात निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिकमध्ये सर्वाधिक प्रमाण प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचे आहे. त्यातही प्रामुख्याने पर्यावरणास घातक असलेल्या तसेच १०० ते १५० वर्षांपर्यंत विघटन न होणाऱ्या पिशव्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे या पिशव्यांना शहरात बंदी असतानाही कचऱ्यात त्याचेच सर्वाधिक प्रमाण आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या काही प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे...
नागरिकांकडून या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ओला कचरा भरून त्या रस्त्यावर जागा मिळेल तिथे टाकल्या जातात. या पिशव्यांमध्ये अन्नपदार्थ असल्याने अनेक भटकी जनावरे पिशवीसह ते अन्न खातात. त्यामुळे अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यात जलचर प्राणी तसेच पक्ष्यांनाही आपला जीव गमवावा लागतो.
अनेकदा या पिशव्यांमध्ये कचरा भरून त्या नाल्यांमध्ये टाकल्या जातात. त्यामुळे अशा पिशव्या एका ठिकाणी साचून पावसाळ््यात नाले तुंबतात, तर अनेक ठिकाणी चेंबरही तुंबून पूरसदृश स्थिती निर्माण होते. त्यामुळे अशाप्रकारे उपाययोजना केल्यास हा प्रश्न सुटेल.
या पिशव्यांमध्ये नागरिक ओला आणि सुका कचरा एकत्र करून भरतात. त्यामुळे कचरा प्रकल्पांवर या पिशवित आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होत नाही. तसेच प्रक्रिया प्रकल्पांमध्येही प्लॅस्टिकमुळे तांत्रिक बिघाड निर्माण होतात, तर कर्मचाऱ्यांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरणातही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे प्लॅस्टिक जाळले गेल्यास त्यापासून निर्माण होणारे टॉक्सिक गॅस पर्यावरणासाठी अतिशय घातक असतात. त्याचे मानवी आरोग्य तसेच पक्ष्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. त्यामुळे प्लॅस्टिकची योग्य विल्हेवाट वेळेत लागणे आवश्यक असते. या कचऱ्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे काळजी घेतली पाहिजे.
महापालिका प्लॅस्टिकचं काय करणार
महापालिकेकडून संकलित करण्यात येणारे हे प्लॅस्टिकचा प्रामुख्याने पुनर्वापर केला जाणार आहे. त्यात काही कचरावेचकांना विकसण्यासाठी काही कचरा कंपन्यांना तर काही कचऱ्यापासून इंधन तयार करून ते महापालिकेसाठी वापरले जाणार आहे. तर दैनंदिन कचऱ्यातून हे प्लॅस्टिक कमी झाल्यास महापालिकेच्या वर्गीकरण तसेच प्रक्रिया प्रकल्पांची मोठी समस्या सुटणार आहे.