भारतीय हॉकी संघाला देशी प्रशिक्षक द्या - धनराज पिल्ले
By Admin | Updated: June 21, 2014 23:42 IST2014-06-21T22:45:48+5:302014-06-21T23:42:56+5:30
भारतातील हॉकी खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे.

भारतीय हॉकी संघाला देशी प्रशिक्षक द्या - धनराज पिल्ले
इस्लामपूर : भारतातील हॉकी खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. हॉकीमधील भारताचे गतवैभव पुन्हा मिळवायचे असेल, तर हॉकी महासंघाने भारतीय हॉकी प्रशिक्षक नेमावेत, अशी मागणी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी शनिवारी येथे केली. संदीप बत्रा हे हॉकी महासंघाचे हुकूमशहा बनले आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
येथे प्रा. चंद्रकांत कळसकर या क्रीडा प्रशिक्षकाचा गौरव सोहळ्यासाठी आल्यानंतर पिल्ले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पिल्ले म्हणाले की, देशाला ऑलिंपिक, आशियाई यासह अन्य आंतराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून पदकांची अपेक्षा असेल तर पहिल्यांदा सर्व खेळांतील पायाभूत सुविधा, व्यवस्था भक्कम करायला हव्यात. हॉकी खेळाडूंना अद्ययावत आणि प्रगत प्रशिक्षणाची गरज आहे. त्यासाठी स्वत: मैदानावर काही काळ खेळलेला देशातीलच खेळाडू प्रशिक्षक असायला हवा. पुस्तकी शिक्षण घेतलेला प्रशिक्षक अजिबात नियुक्त केला जाऊ नये. परदेशी प्रशिक्षकांनी भारतीय हॉकी संघाचा दर्जा उंचावण्याऐवजी तो कमी करण्याचे काम केले आहे. नुकत्याच झालेल्या विश्वकप हॉकीत भारताचा संघ नवव्या स्थानावर फेकला गेला, ही विदेशी प्रशिक्षकाची मिळालेली देणगी आहे. त्यांच्यावर लाखो रुपये उधळण्याचे काम हॉकी महासंघाने थांबवायला हवे. मेजर ध्यानचंद, मोहंमद शहीद यासारखे खेळाडू घडवणारे प्रशिक्षक भारतीयच होते. भारताचे लोक परदेशात सीईओ म्हणून काम पाहतात आणि भारतीय हॉकीची सीईओ मात्र एक ऑस्ट्रेलियन महिला आहे.
विदेशी प्रशिक्षक असला तर राजकारण होत नाही, असे हॉकी महासंघाचे प्रमुख संदीप बत्रा म्हणतात; हे साफ चुकीचे आहे. मग आंतरराष्ट्रीय स्पर्धात सर्वाधिक गोल नोंदवणार्या संदीपसिंगला विश्वकप खेळणार्या संघातून का वगळले, याचे उत्तर बत्रा यांनी द्यावे अशी मागणी पिल्ले यांनी केली.
हॉकी लिगसारख्या संकल्पना खेळाडूंसाठी चांगल्या आहेत. पािमात्यांचे अनुकरण न करता प्रशिक्षणात सुधारणा झाल्या पाहिजेत. देशासाठी खेळण्याची उर्मी प्रत्येक खेळाडूत निर्माण व्हायला हवी आणि ते काम फक्त देशी प्रशिक्षकच करू शकतो, असेही पिल्ले म्हणाले.
देशासाठी १६-१७ वर्षे खेळणारा मी एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे मी भारताच्या हॉकी संघाचा प्रशिक्षक होण्यास तयार आहे. मात्र मी हॉकी महासंघाच्या हातचे बाहुले बनणार नाही. त्यामुळे ते मला बोलावतील, असे वाटत नाही. मात्र जर बोलावणे आलेच तर देशाच्या हॉकीला गतवैभव मिळवून देण्याच्या मी प्रतीक्षेत आहे, असेही शेवटी पिल्ले यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक प्रा. वीरसेन पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, संजय कोरे, राष्ट्रीय खेळाडू संदीप कदम उपस्थित होते. (वार्ताहर)