इंदापूर नगर परिषदेला मुख्याधिकारी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:11 IST2021-03-31T04:11:10+5:302021-03-31T04:11:10+5:30

-- इंदापूर : इंदापूर नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांची खुर्ची मागील अनेक महिन्यांपासून रिकामीच आहे. त्यामुळे अनेक विकासकामांना खीळ बसली ...

Give Indapur Municipal Council Chief | इंदापूर नगर परिषदेला मुख्याधिकारी द्या

इंदापूर नगर परिषदेला मुख्याधिकारी द्या

--

इंदापूर : इंदापूर नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांची खुर्ची मागील अनेक महिन्यांपासून रिकामीच आहे. त्यामुळे अनेक विकासकामांना खीळ बसली असून, सामान्य नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. इंदापूर नगर परिषदेला नियमित मुख्याधिकारी द्यावा, या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने गाढवाची मिरवणूक काढत आंदोलन केले.

बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारच्या वेळी, गाढवाच्या अंगावर ‘नमस्कार मी इंदापूरचा नवीन मुख्याधिकारी" ( सी. ओ) आज पासून सर्व कामे पूर्ण वेळ उपस्थित राहून करीन, असा संदेश लिहलेला बॅनर गाढवाच्या अंगावर टाकून, त्याला हार घालून, त्याची पूजा करून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने त्या गाढवाचे स्वागत करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

इंदापूर नगरपरिषदेत कामानिमित्त आलेल्या नागरिकांनीही निषेध म्हणून चक्क गाढवासमोर त्यांच्या कामाचा प्रस्ताव ठेवून, निषेध नोंदवला. प्रभारी मुख्याधिकारी म्हणून दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी दौंड वरून इंदापूर नगरपालिकेचे काम पाहत आहेत. इंदापूरला येत नसल्याने शहरातील नागरिकांना अडचणी येत आहेत. मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील नागरिकांची कामे अडून पडत आहेत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

इंदापूर नगरपालिकेला तत्काळ नियमित मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा. अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अगोदरच देण्यात आला होता. मात्र, कोणतीही हालचाल झाली नसल्याने, या वेळी संजय शिंदे, संतोष क्षीरसागर, राहुल शिंगाडे, नानासाहेब चव्हाण, बलभीम महाराज राऊत, सूरज धाईंजे, नागेश भोसले, ॲड. सूरज मखरे, संतोष धोत्रे, उमेश ढावरे, नितीन देशमाने, भारत मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

--

फोटो ३० इंदापूर नगरपरिषद

फोटो ओळ : बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने गाढवाला बॅनर लावून निषेध केला.

Web Title: Give Indapur Municipal Council Chief