किरण शिंदे/पुणे/लोकमत न्यूज नेटवर्क
प्रेमसंबंध तुटल्यानंतर वैतागलेल्या एका तरुणाने प्रेयसीला लग्नासाठी मानसिक त्रास देत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघेही मूळचे कोल्हापूरचे आहेत. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात काही कारणांमुळे मतभेद झाले आणि तरुणीने ब्रेकअप केले. ब्रेकअपनंतर पीडित तरुणीने आयटी क्षेत्रात नोकरीस सुरुवात केली आणि सध्या ती पुण्यातील एका कंपनीत काम करत आहे.
दरम्यान, ब्रेकअपनंतरही आरोपी तरुण तिला सतत फोन आणि मेसेज करून लग्नासाठी तगादा लावत होता. पीडित तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने संतप्त होऊन दोघांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे तिला सतत अश्लील मेसेज आणि कॉल्स करून मानसिक छळ सुरू केला होता. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि भारतीय दंड विधानातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.