जिरायती पट्ट्यात चौैथ्या वर्षी खरीप जाणार वाया
By Admin | Updated: July 7, 2015 02:44 IST2015-07-07T02:44:32+5:302015-07-07T02:44:32+5:30
बारामती तालुक्यातील जिरायती भागातील खरीपाच्या आशा धूसर झाल्या आहेत. विशेषत : जिरायती भागाचा मुख्य आधार असलेला खरीप हंगाम सलग चौथ्या वर्षी वाया जात आहे.

जिरायती पट्ट्यात चौैथ्या वर्षी खरीप जाणार वाया
लोणी भापकर : बारामती तालुक्यातील जिरायती भागातील खरीपाच्या आशा धूसर झाल्या आहेत. विशेषत : जिरायती भागाचा मुख्य आधार असलेला खरीप हंगाम सलग चौथ्या वर्षी वाया जात आहे.
यामुळे शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, दुध उत्पादकांपुढे मोठेच संकट ठाकल्याचे चित्र आहे. तर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतिक्षा करावी लागत आहे. े.यामुळे या भागातील नवीन पिढी शहराकडे स्थलांतरित होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
मोरगाव, सुपे या जिरायती पट्ट्यात खरीप हंगामातील बाजरी ,मूग ,मटकी, हुलगा, सूर्यफूल, हळवी कांदा ही पीके घेतली जातात. पुरेशा पाऊस असेल तर ही पीके केवळ पावसावरही पदरात पडतात. यासाठी मे महीन्यातील मान्सूनपूर्व रोहीणी नक्षत्रातील अवकाळी पावसाची गरज असते. त्यानंतर जून महीन्यातील मृग नक्षत्रातील ओलीवर पेरण्या मार्गी लागतात. मात्र यंदा सलग चौथ्या वर्षी मे जून मधील पावसाने हुलकावणी दिली. कमी दाबाच्या प्रभावामुळे झालेल्या थोडयाशा पावसाच्या ओलीवर या भागात बाजरी, मूग, कांदा या पीकांच्या पेरण्या उरकल्या आहेत. मात्र नंतर पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने उगवलेली पीके सुकून जात आहे.यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
दिवसभर कडक ऊन व वाहणारे कोरडे वारे यामुळे सध्यातरी पावसाची शक्यता नसल्याने उगवलेली पिके आणखी किती दिवस तग धरणार अशा विवंचनेत शेतकरी वर्ग आकाशाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र जिरायती भागात दिसत आहे.
या भागातील मजूरवर्ग बागायती भागाकडे स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहे. ऐन पावसाळ्यात परीसरातील ओढे, नाले, पाझर तलाव कोरडेच आहेत. (वार्ताहर)