करवाढीची टांगती तलवार
By Admin | Updated: December 16, 2014 04:15 IST2014-12-16T04:15:12+5:302014-12-16T04:15:12+5:30
महापालिकेच्या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात पुणेकरांवर करवाढीचा भार टाकण्यात येणार आहे.

करवाढीची टांगती तलवार
पुणे : महापालिकेच्या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात पुणेकरांवर करवाढीचा भार टाकण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने २०१५-१६ या वर्षासाठी पाणीपट्टी, मिळकत करासह विविध करात मिळून सुमारे २२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरापासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची चर्चा आहे. त्यामुळे चालू वर्षात एलबीटीपासून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच, बांधकाम क्षेत्रातील आर्थिक मंदीमुळे पालिकेचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शिवाय भोगवटा पत्र नसलेल्या मिळकतींचा तिप्पट कर रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात तब्बल ५०० कोटींहून अधिक तूट येण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षात मिळकतकरामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर २०१५-१६ या वर्षासाठी विविध करांमध्ये साधारण १८ टक्के वाढीचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे.
निवासी मिळकतीच्या पाणीपट्टीमध्ये जी दरवाढ सुचविण्यात आली आहे त्यामधून सरासरी पाणीपट्टीमध्ये ९०० रुपये इतकी वार्षिक वाढ येत आहे. त्यामुळे ७५ कोटींचे उत्पन्न वाढणार असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. प्रशासनाच्या करवाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीनंतर मुख्यसभेत मान्यता घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)