दिग्गजांच्या गायकीचा सांगीतिक वेध
By Admin | Updated: March 21, 2015 00:20 IST2015-03-21T00:20:25+5:302015-03-21T00:20:25+5:30
पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी ही तीन अमूल्य रत्ने. संगीतविश्वात निर्माण केलेल्या गायनशैलीतून स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्यात ‘ते’ यशस्वी ठरले.

दिग्गजांच्या गायकीचा सांगीतिक वेध
पुणे : भारतीय अभिजात संगीत दरबारातील स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी ही तीन अमूल्य रत्ने. संगीतविश्वात निर्माण केलेल्या गायनशैलीतून स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्यात ‘ते’ यशस्वी ठरले. याच दिग्गजांच्या सांगीतिक कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या ‘त्रिवेणी संगम’ या नाट्य आणि भक्ती संगीताच्या मैफिलीने रसिकांची शुक्रवारची सायंकाळ अविस्मरणीय ठरली.
तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आपला परिसर यांच्या वतीने आयोजित अकराव्या पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवामध्ये हिंदुस्थानी सांगीतिक परंपरेतील या दिग्गज कलाकारांच्या प्रतिभावंत गायकीचा नजराणा त्यांचेच शिष्य आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि पं. शौनक अभिषेकी यांनी त्यांच्याच गानशैलीतून रसिकांसमोर पेश केला. ‘तम भवललाट’ या गणेशवंदनेने त्यांनी गायकीस प्रारंभ केला. ‘हिंडोल गावत सब, ओढत कल्याण थाट’ ही १८ रागांची मालिका एकसूरात सादर करीत त्रिवेणी संगमाची खऱ्या अर्थाने अनुभूती दिली. त्यानंतर तिघाही प्रतिभावंत गायकांनी आपल्या संगीत संस्काराच्या गानशैलीचे दर्शन एकलरीतीने रसिकांना घडविले. भाटे यांनी मारवा रागातील ‘गुरू बिन ज्ञान ना पाऊँ मैं’ ही बंदिश अभिजाततेतून खुलविली. शौनक अभिषेकी यांनी वडील जितेंद्रबुवांनी अजरामर केलेले ‘लागी करेजवा कट्यार’ सादर करून रसिकांची दाद मिळविली. धनश्री लेले यांनी ओघवत्या शैलीतील निवेदन केले.(प्रतिनिधी)
पुढचा महोत्सव
१२ दिवसांचा
४या महोत्सवाचे पुढचे बारावे वर्ष आहे. त्यामुळे पुढील वर्षाचा महोत्सव दहा नव्हे, तर तब्बल बारा दिवसांचा होईल, अशी घोषणा उज्ज्वल केसकर यांनी केली.