अंधश्रद्धा निर्मूलन समितीत विसंवादाचे ‘भूत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:01+5:302020-11-28T04:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विवेकवादाची चळवळ जनमानसात रूजविणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये हुकुमशाही प्रवृत्तीचा शिरकाव झाल्यामुळे समितीमध्ये फूट ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीत विसंवादाचे ‘भूत’
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विवेकवादाची चळवळ जनमानसात रूजविणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये हुकुमशाही प्रवृत्तीचा शिरकाव झाल्यामुळे समितीमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर कुटुंबीय आणि त्यांचे समर्थक एका बाजूला तर दुसरीकडे कार्याध्यक्ष अविनाश पाटील असे दोन दोन गट समितीमध्ये पडले आहेत.
कार्याध्यक्ष पाटील यांचा एककल्ली कारभार आणि अहंम वृत्ती यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. दाभोलकर परिवाराला महत्त्व देण्यासंदर्भात काहीजणांची वेगळी भूमिका आहे. या विसंवादाचा फटका ‘अंनिस’च्या दोन संघटना होण्यात होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून समितीच्या दोन्ही गटांमध्ये ही खदखद आहे. अविनाश पाटील यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर समितीचा कारभार कसा असावा आणि त्याचे आर्थिक नियोजन कसे असावे यावरून मतभेदांना सुरूवात झाली.
समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी समितीमधल्या वादंगाला दुजोरा दिला. ‘लोकमत’ला त्यांनी सांगितले, की संघटनात्मक कामात मतभिन्नता असणारच. हेच लोकशाहीचे लक्षण आहे. पण विवेकवादी मार्गातून सर्वांच्या मताच्या आदर राखण्याचे संस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आमच्यावर केले. मात्र कोणी विरोधी मत व्यक्त केले तर त्याला बाहेर काढण्याची अविनाश पाटील यांची कार्यपद्धती आहे. एकप्रकारे त्यांचा एककल्ली कारभार सुरू होता. माध्यमांमध्ये दाभोलकर कुटुंबीय सातत्याने प्रकाशझोतात येते हे पाटील यांना खपत नव्हते. मला महत्व न देता त्यांना दिले जाते आहे, यातून त्यांच्या अहंकार सातत्याने दुखावत राहिला. अविनाश पाटील यांनी कितीतरी गोष्टी आमच्या मनविरूद्ध केल्या. पण आम्ही काही बोललो नाही. सगळं आपल्या हातात असलं पाहिजे असे त्यांना वाटत आहे.”
यापूर्वीही डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि श्याम मानव यांच्यात विसंवाद निर्माण झाल्याने ‘अंनिस’मध्ये फुट पडली होती. मानव यांनी समितीची कार्यकारिणी बरखास्त केली. त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहून दीड ते दोन वर्षांनी वेगळी संघटना उभी केली. श्याम मानव यांनी स्वत:ची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत ठेवली.
---------------------------------------------
वादविवाद खेदजनक
“संघटनेचे वादविवाद हे अशा पद्धतीने समोर येणे हे निश्चितच खेदजनक आहे. हे वाद संघटनेच्या अंतर्गत पातळीवर सुटावेत असे वाटते. यावर अधिक बोलणं योग्य नाही. लवकरच संघटनेच्या माध्यमातून भूमिका मांडू.”
- डॉ. हमीद दाभोलकर
-----------------------------------------------
माध्यमांसमोर बोलणार
“माझी भूमिका मी लवकरच माध्यमांसमोर मांडेन. आत्ता याबाबत काही सांगू शकत नाही.”
- अविनाश पाटील, कार्याध्यक्ष, अंनिस
-----------------------------------------------