मकर संक्रांती पुर्वीच हळदी कुंकू करण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:31+5:302021-01-13T04:25:31+5:30
पुणे जिल्ह्यातील ६५० ग्रामपंचायती पंचवार्षिक निवडणुकीस सामो-या जात आहेत. १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. एकूण २ हजार ...

मकर संक्रांती पुर्वीच हळदी कुंकू करण्याचा घाट
पुणे जिल्ह्यातील ६५० ग्रामपंचायती पंचवार्षिक निवडणुकीस सामो-या जात आहेत. १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. एकूण २ हजार ३१ प्रभागातील ४ हजार ९०४ जागांसाठी दुपटीपेक्षा जास्त म्हणजे ११ हजार ७ उमेदवार निवडणूकीस सामोरे जात आहेत. २३ डिसेंबर रोजी उमेदवारी निश्चित झालेनंतर मते आपल्यालाच मिळावीत म्हणून काही उमेदवारांनी जेजुरीच्या खंडोबाच्या जागरण गोंधळाच्या नावाखाली सामिष मांसाहारी जेवणाच्या पंगती घालण्यास सुरूवात केली तर काही उमेदवारांनी शेतीच्या बांधावरील म्हसोबाला नविन शेंदूर थापून रानजत्रा करण्याचा धडाका लावला आहे. तर काहींनी आपल्या प्रभागांत शाकाहारी व मांसाहारी जेवणावळींचा धडाका लावला आहे. स्वाभिमानी अथवा आपण बदनाम होवू नये म्हणून जेवणावळ टाळणा-या खास मतदारांना तर जेवण घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था निष्ठावंत कार्यकर्त्यांमार्फत करण्यात गावागावात करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे.
असे असताना निवडूण येण्यासाठी आसुलेले उमेदवार मतदारांशी संपर्क साधण्याची मकर संक्रांती या महिला विशेष सणाची सुवर्णसंधी कशी सोडतील. गुरुवार ( १४ जानेवारी ) रोजी मकरसंक्रात तर दुस-याच दिवशी म्हणजे १५ जानेवारी रोजी मतदान आहे. तर निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रचाराची सांगता बुधवार ( १३ जानेवारी ) रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. असे असले तरी या सणाचे कवित्व मात्र सणापुर्वीच सुरू झाले आहे. महिलांना मकरसंक्रातीचे निमित्त सांंगून अगोदरच हळदी - कुंकू समारंभाला निमंत्रित करायचे एखादी जास्त महाग नसलेली छोटीशी भेटवस्तू द्यायची. व हळूच आपला प्रचार करायचा. असे प्रचाराचे ठाम नियोजन इच्छुक महिला उमेदवार अथवा त्यांच्या यजमानांनी आखले आहे. भेटवस्तू छोटी असल्याने खर्च जास्त करावा लागत नाही. तसेच हिंदू संस्कृती मध्ये कुठल्याही विवाहित महिलेला हळदी - कुंकू समारंभाचे निमंत्रण म्हणजे मोठा मान मिळाला असे समजले जाते. त्यामुळे शक्यतो या समारंभाचे आमंत्रण कुठलीही महिला नाकारत किंवा टाळत नाही. या मुद्द्याचे महत्व लक्षात घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिना-या उमेदवारांनी कमी खर्चात आपला प्रचार करून जास्तीत जास्त मतदारांपर्यत पोहचण्याचा मनसुबा आखला आहे.
या पैकी काही हळदी कुंकू समारंभ प्रतीवर्षी आयोजित केले जातात. मात्र ग्रामपंचायत निवडणूका असल्याने हळदी कुंकू समारंभाच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.